
केंद्रीय कृषी आणि ग्रामिण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विकसित कृषी संकल्प अभियानाच्या अंतर्गत आज विविध राज्यातील आमदारांशी व्हर्च्युअल संवाद साधला. विकसित कृषी संकल्प अभियान ही फक्त सरकारी योजना नाही तर एक जन आंदोलन आहे. याचा उद्देश 29 मे पासून 12 जून 2025 पर्यंत 1 कोटीहून अधिक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणं आहे. या अभियानाची सुरुवात पुरी आणि ओडिशाहून झाली. आता ही मोहीम संपूर्ण देशात शेतकऱ्यांच्या जागृकतेची लाट बनली आहे, असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले.
2170 टीमने आतापर्यंत 7368 गावात 4416 दौरे करून 795000 शेतकऱ्यांना या अभियानाशी जोडलं आहे. या अभियानासाठी स्थापन करण्यात आलेली ही टीम देशातील सर्व राज्यातील शेतकऱ्यांना कृषी ज्ञान णइ विज्ञानाची माहिती देणार आहे. तसेच विकसित कृषीला वास्तवात बदलण्यासाठी त्यांना प्रेरित करणार आहे. या टीम्स गावाकडे जाऊन शेतकऱ्यांना हवामान अनुकूल वाणांचा वापर, खतांचा संतुलित उपयोग, मृदेत पोषक तत्त्वांची माहिती आणि त्यांचे संरक्षण, तसेच पिकांमध्ये येणारे रोग व त्यावरील उपचार, शेतीमध्ये विविधता वाढवणाऱ्या तंत्रज्ञानांबाबत सविस्तर माहिती देतील, असं शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं.
सध्याच्या आव्हानांचा विचार करता शेतीमध्ये विविधता वाढवणाऱ्या तंत्रज्ञानांचा प्रसार — जसे की नैसर्गिक शेती, कृषी क्षेत्रात ड्रोनचा वापर, पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यपालन यांसारख्या प्रमुख विषयांवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी हे अभियान अतिशय उपयुक्त ठरेल. या अभियानाअंतर्गत या सर्व विषयांवर शेतकऱ्यांशी चर्चा केली जाईल आणि त्यांच्या शंका-समाधानासाठी संबंधित विषयातील तज्ज्ञ उपलब्ध असतील. या उपक्रमाचा थेट फायदा शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगामात मिळेल, असंही ते म्हणाले.
सर्व संबंधित भागधारकांसोबत मिळून राबवले जाणारे हे अभियान “प्रयोगशाळेपासून शेतापर्यंत (Lab to Land)” या विकसित भारतासाठी सुरू केलेल्या कार्यक्रमात महत्वाची भूमिका बजावेल आणि त्याला बळकट करेल. “एक देश – एक शेती – एक टीम” हा आपला मूलमंत्र आहे. या मूलमंत्राद्वारे कृषी वैज्ञानिक, अधिकारी आणि शेतकरी एकत्र येऊन भारताला “विकसित भारत – 2047” च्या दिशेने घेऊन जातील, असं त्यांनी सांगितलं.
आमदारांनी शेतकऱ्यांना वैज्ञानिकांशी संवाद साधण्यासाठी आणि प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असं आमदारांना आवाहन करतानाच आपला उद्देश आहे — कमी खर्च, अधिक उत्पादन, शाश्वत शेती आणि फायदेशीर कृषी, असही ते म्हणाले.
या कार्यक्रमाचा एक उद्देश हा देखील आहे की कृषी विज्ञान केंद्राचे विषयतज्ज्ञ व कृषी अनुसंधान परिषदेचे वैज्ञानिक, शेतकऱ्यांच्या दारात व शेतात जाऊन त्यांच्या नवकल्पनांमधूनही काही शिकतील. ही एक नवीनतम संकल्पना आहे जी भारतीय कृषी विज्ञान व शेतकऱ्यांच्या विकासकथेतील एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.