राज्यात पावसाची गती मंदावली, पाऊस घेणार ब्रेक, कृषी विभागाचा शेतकऱ्यांना महत्वाचा सल्ला
राज्यात मे महिन्यात चांगला पाऊस झाला. परंतु आता पाऊस ब्रेक घेणार आहे. १२ जूननंतर पाऊस सक्रीय होईल. यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला. मे महिन्यात राज्यात मान्सून पोहचण्याचा विक्रम झाला. तसेच मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नदी, नाले दुथडी भरुन वाहू लागले. परंतु आता राज्यात पावसाची गती मंदावली आहे. पुढील १२ जूनपर्यंत पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. मुंबईत शनिवारी रात्री पावसाच्या तुरळक सरी पडल्या. मात्र, रविवार वातावरणात पावसाची चिन्ह नव्हती.
राज्यात मान्सूनने जोरदार सुरुवात केली असली तरी आता त्याची गती मंदावली आहे. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी यंदा वेगाने वाटचाल करत देशात लवकर आगमन केले. २६ मे रोजी राज्यात दाखल झालेल्या पावसाने कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात दमदार हजेरी लावली. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अनेक भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, सध्या मान्सूनचे प्रवाह कमकुवत झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणीच हलक्या सरी पडणार आहेत. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
राज्यात मे महिन्यात मुसळधार पाऊस झाला. पण गेल्या ४८ तासांपासून मान्सून थांबला आहे. मुंबई, पुणे, कोकण या भागात पाऊस नाही. यामुळे गेल्या तीन दिवसांपासून कमाल तापमानातही वाढ झाली आहे. तापमान २२ अंशावरून ३२ ते ३८ अंशावर गेले आहे.
अजून पेरणीची घाई नको
कृषी विभागाने शेतकऱ्यांना सध्या पेरणीची घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण पुढील काही दिवसांत मान्सूनची प्रगती संथ राहण्याची शक्यता आहे. मात्र १२ जूननंतर पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. हवामान विभागाच्या सरकारी दप्तरात मान्सून हंगामाचा पाऊस एक जून पासून नोंदवण्यास सुरुवात होते. १ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत पडलेला पाऊस मान्सूनचा पाऊस म्हणून नोंदवला जातो.
