यूरीयाची चढ्या दरानं विक्री, शेतकऱ्याकडून भांडाफोड; कृषी विभागात खळबळ, कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द

| Updated on: Sep 01, 2021 | 2:03 PM

यूरिया खत 266 रुपयाला विक्री करायचे असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, यूरिया खतांची बॅग 400 रुपयाला सरार्स विक्री केली जात आहे, अशा अनेक तक्रारी येतात.

यूरीयाची चढ्या दरानं विक्री, शेतकऱ्याकडून भांडाफोड; कृषी विभागात खळबळ, कृषी सेवा केंद्राचा परवाना रद्द
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

भंडारा: विदर्भातील भंडारा जिल्ह्यात शेतकऱ्यांची लूट थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे. यूरिया खत 266 रुपयांना विकण्याचे शासनाचे निर्देश असताना सुद्धा कृषी केंद्र चालक 400 रुपयाला यूरिया खतांची बॅग विकत असल्याचा व्हिडीओ शेतकऱ्यांनी तयार केला आहे. शेतकऱ्यानं व्हिडीओ केल्यानंतर कृषी विभागात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओनंतर जागे झालेल्या प्रशासनानं अखेर कृषी केंद्र चालकाचा परवाना रद्द केला आहे.

शेतकऱ्यांची लूट सुरुच

यूरिया खत 266 रुपयाला विक्री करायचे असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र, यूरिया खतांची बॅग 400 रुपयाला सरार्स विक्री केली जात आहे, अशा अनेक तक्रारी येतात. कृषी विभाग त्यावरही कारवाई देखील करते मात्र कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांना लुटण्याचा प्रकार काही थांबताना दिसत नाही. कृषी विभाग आणि प्रशासनानं याबाबत कठोर कावाई करणं आवश्यक आहे, अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील पोपटानी कृषी सेवा केंद्र या ठिकाणी शेतकऱ्यांनी लूट केली जात आहे असल्याचं समोर आलं आहे. 266 रुपयांची युरिया खतांची बॅग 300 रुपये व लिंकिंग पॉवर 100 रुपये असे एकूण 400 रुपयांना विक्री केली जात आहे. शेतकऱ्यांनी केंद्र चालकांची विचारणा केली असताना शेतकऱ्यांना खत दिलं जात नाही.

पॉश मशीन वापराकडं दुर्लक्ष

शेतकरी खत खरेदी करायला आल्यावर आधारकार्डच्या साहाय्याने पॉश मशीनवर एन्ट्री करून तशी पावती शेतकऱ्यांना दिली जाते. मात्र, कृषी केंद्रचालक शासनाच्या निर्देशाला सर्रास दुर्लक्ष करत असल्याचा दिसत आहे. या संबंधित जिल्हा कृषी अधिकारी यांना विचारणा केली असताना कृषी अधिकाऱ्यांनी व्हिडिओची पळताळणी केली असून पोपटांची कृषी केंद्र यांचा परवाना रद्द केला आहे. यापुढे काय कारवाई होणार याकडं पाहावं लागणार आहे.

शेतकऱ्यांनी तक्रारी करण्याचं आवाहन

ज्या कृषी केंद्र चालकांनी यूरिया बॅग 266 पेक्षा जास्त विक्री किंवा खतासोबत इतर मिश्र खते शेतकऱ्यांच्या माथी मारले तर शेतकऱ्यांनी याची तक्रार करावी असे ही आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे. तर, कृषी केंद्र चालकांना कृषी विभागाची मूकसंमती तर नाही ना असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहेत.

शेतकरी त्रस्त

आता कृषी केंद्र चालकांच्या मनमानी कारभारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. कृषी केंद्र चालकांवर फक्त तात्पुरता निलंबन करून प्रश्न सुटणार नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी शासनाला कठोर पाऊले उचलावे लागतील. तेव्हाच कृषी केंद्र चालकांना चपराक बसेल व शेतकऱ्यांची होणारी लूट थांबेल अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

इतर बातम्या:

झेंडूचं फूल तोडल्यानं मारहाण, पपईची बाग कापून बदला, नंदुरबार पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या

सोयाबीनवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव; चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांवर मोठं संकट

Bhandara Farmer shoot video of urea sale on extra price by agriculture service center