नोकरी सोडा, गाढवं पाळा; सरकारकडून मिळतील 50 लाख, नेमकी योजना काय?

नोकरी सोडून व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांसाठी गाढव पालन हा आता फायदेशीर पर्याय ठरत आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत सरकार गाढव पालनासाठी ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान देत आहे. या योजनेचे नियम, अटी आणि अर्ज प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा.

नोकरी सोडा, गाढवं पाळा; सरकारकडून मिळतील 50 लाख, नेमकी योजना काय?
Donkey Farming
| Updated on: Mar 05, 2026 | 1:40 PM

अनेकदा नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर हॉटेल, एखादा गाडी किंवा कारखाना सुरु करण्याचे विचार डोक्यात येतो. पण तुम्हाला माहिती आहे का? आता गाढव पालन करुनही तुम्ही करोडपती होऊ शकता. केंद्र सरकारने गाढव पालनाला प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (NLM) एक मोठी योजना सुरू केली आहे. याद्वारे गाढव पालन करणाऱ्याला तब्बल ५० लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे.

नेमकी योजना काय आहे?

राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (NLM) घोडा, उंट किंवा गाढव पालनासाठी सरकार आर्थिक मदत करत आहे. जर एखादी व्यक्ती, शेतकरी उत्पादक संस्था (FPO), बचत गट (SHG) किंवा नोंदणीकृत कंपनी या व्यवसायासाठी अर्ज करत असेल तर एकूण खर्चाच्या ५० टक्के अनुदान सरकार देते. या अनुदानाची मर्यादा जास्तीत जास्त ५० लाख रुपये इतकी आहे. जर तुमच्या प्रकल्पाचा खर्च १ कोटी रुपये असेल, तर सरकार तुम्हाला ५० लाख रुपये देईल.

अर्ज कसा कराल?

या योजनेसाठी संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन असणार आहे. यासाठी केंद्र सरकारच्या nlm.udyamimitra.in या अधिकृत वेबसाईटवर जा. तिथे ‘Apply Here’ वर क्लिक करून मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी वापरून नवीन खाते तयार करा. मिळालेल्या आयडी आणि पासवर्डने लॉगिन करा. ‘Animal Husbandry’ विभागांतर्गत ‘Donkey/Horse/Mule/Camel’ ही श्रेणी निवडा. तसेच अर्जात तुमची वैयक्तिक माहिती, जागेचा पत्ता आणि बँक तपशील भरा. सर्व कागदपत्रे (DPR सह) योग्य फॉरमॅटमध्ये अपलोड करा. माहितीची खात्री करून अर्ज Submi’ करा. तुम्हाला एक Application ID मिळेल, तो जपून ठेवा.

कोणकोणती कागदपत्रं आवश्यक?

  • ओळख आणि पत्त्याचा पुरावा: आधार कार्ड, पॅन कार्ड, आणि रहिवासी दाखला (किंवा वीज बिल).
  • जमिनीची कागदपत्रे: सातबारा (7/12) उतारा, ८-अ उतारा (स्वतःची जमीन असल्यास) किंवा किमान १० वर्षांचा भाडे करार (Lease Agreement).
  • प्रकल्प अहवाल (DPR): व्यवसायाचा सविस्तर आराखडा (खर्च, उत्पन्न आणि नियोजित आराखडा).
  • बँक तपशील: बँक पासबुकची प्रत आणि कॅन्सल चेक.
  • अनुभव प्रमाणपत्र: पशुपालनाचे प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा अनुभव असल्यास त्याचे पत्र.
  • फोटो: अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
  • कंपनी/गट कागदपत्रे: जर अर्ज SHG, FPO किंवा कंपनीच्या नावाने असेल, तर नोंदणी प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड.

गाढव पालनाचे नियम आणि अटी

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही विशेष नियम निश्चित केले आहेत
  • एका युनिटमध्ये किमान ५० मादी आणि ५ नर गाढवे असणे आवश्यक आहे.
  • हे अनुदान फक्त भारतीय (स्थानिक) जातीच्या गाढवांसाठीच मिळेल, परदेशी जातींसाठी नाही.
  • अनुदानाची रक्कम दोन टप्प्यात मिळेल. यातील पहिला हप्ता बँक कर्ज मंजूर झाल्यावर आणि दुसरा प्रकल्प पूर्ण झाल्यावर दिला जाईल.

सरकार गाढव पालनावर भर का देत आहे?

२०१९ च्या पशुगणनेनुसार, भारतात गाढवांची संख्या केवळ १.२३ लाख उरली आहे. २०१२ पासून या संख्येत ६० टक्क्यांनी मोठी घट झाली आहे. ही घट थांबवण्यासाठी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी सरकारकडून ही योजना राबवली जात आहे.

पशुपालकांसाठी इतर महत्त्वाच्या योजना

१. पशु किसान क्रेडिट कार्ड (Pashu KCC)

ज्याप्रमाणे शेतीसाठी KCC मिळते, तसेच आता पशुपालकांसाठीही क्रेडिट कार्ड उपलब्ध आहे. गाय, म्हैस, शेळी किंवा मेंढी पालनासाठी कोणत्याही हमीशिवाय १.६० लाखांपर्यंत कर्ज मिळू शकते. वेळेवर परतफेड केल्यास व्याजात ३ टक्के अतिरिक्त सवलतही दिली जाते.

२. राष्ट्रीय गोकुळ मिशन (RGM)

भारतीय देशी गाई आणि म्हशींच्या जातींचे संवर्धन करण्यासाठी ही योजना आहे. यात दुग्धोत्पादन वाढवण्यासाठी ब्रीडिंग फार्म सुरू करायचा असल्यास सरकार २ कोटी रुपयांपर्यंत अनुदान देते.

Follow Us