Banana : केळीच्या वाढत्या दराला कुणाची नजर लागली, जाहीर दरापेक्षा कमी दराने खरेदी..!

केळीची खरेदी ही बाजार समितीने जाहीर केलेल्या दराप्रमाणे करावी असा नियम आहे. शिवाय केळीचे दर रावेर बाजार समितीच्या माध्यमातून जाहीर केले जातात. दर्जेदार केळीसाठी 2 हजार 200 असा दर जाहीर केला जात आहे. खरेदीदार या दराकडे दुर्लक्ष करीत वेगवेगळी कारणे देत कमी दराने खरेदी करीत आहेत. सर्वच खरेदीदाराची याबाबत ऐकी झाल्याने शेतकरीही हताश आहेत.

Banana : केळीच्या वाढत्या दराला कुणाची नजर लागली, जाहीर दरापेक्षा कमी दराने खरेदी..!
केळीचे दर अचानक घसरल्याने केळी उत्पादक अडचणीत आहेत.
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Aug 09, 2022 | 4:41 PM

जळगाव :  (Banana Rate) केळीला बारमाही मागणी असते. यंदा तर उत्पादनात घट झाली आणि मागणीही वाढली त्यामुळे केळीला विक्रमी दर मिळाला होता. कधीनव्हे ते 2 हजार 500 रुपये क्विंटल असा दर शेतकऱ्यांना मिळत होता. त्यामुळे (Banana Production) उत्पादन घटले तरी वाढीव दरामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान होते. मात्र, उच्चांकी दरावर पोहचलेल्या केळीच्या दरात कमालीची घसरण सुरु झाली आहे. विशेष म्हणजे श्रावण महिन्यात अधिकची मागणी असताना केळीच्या दरात होत असलेली घसरण (Farmer) शेतकऱ्यांसाठी नुकसानीची ठरत आहे. कधी नव्हे ते वाढीव दरामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता पण व्यापाऱ्यांनी यावर विरझण टाकल्याची चर्चा सुरु आहे. व्यापाऱ्यांनी एकी करुन केळीचे दर घटवले असा आरोप होत आहे.

कशामुळे घटले केळीचे दर?

निसर्गाच्या लहरीपणावर मात करुन शेतकऱ्यांनी केळी बागा जोपासल्या होत्या. शिवाय हंगामाच्या सुरवातील कवडीमोल दरात केळीची विक्री करावी लागली होती. असे असताना वाढती मागणी आणि घटलेले उत्पादन यामुळे केळी 2 हजार 500 ते 3 हजार रुपये क्विंटलपर्यंत गेली होती. त्यामुळे उत्पादन घटले तरी वाढीव दरातून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता. पण आता मागणी कमी आणि इतर फळांची बाजारपेठेत आवक वाढल्याचे कारण पुढे करीत केळीचे दर घटविण्यात आल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. सध्या केळीला 1 हजार ते 1 हजार 200 रुपये क्विंटल असा दर मिळत आहे.

जाहीर दरापेक्षा कमीने खरेदी

केळीची खरेदी ही बाजार समितीने जाहीर केलेल्या दराप्रमाणे करावी असा नियम आहे. शिवाय केळीचे दर रावेर बाजार समितीच्या माध्यमातून जाहीर केले जातात. दर्जेदार केळीसाठी 2 हजार 200 असा दर जाहीर केला जात आहे. खरेदीदार या दराकडे दुर्लक्ष करीत वेगवेगळी कारणे देत कमी दराने खरेदी करीत आहेत. सर्वच खरेदीदाराची याबाबत ऐकी झाल्याने शेतकरीही हताश आहेत. त्यामुळे 3 हजार रुपये क्विटंलवर गेलेले केळीचे दर आता थेट 1 हजार रुपये क्विंटलवर येऊन ठेपले आहेत.

परराज्यात केळीचे दर टिकून

केळीचे घटते उत्पादन आणि वाढती मागणी पाहता केळीला अधिकचा दर मिळणे गरजेचे आहे. असे असतानाही जळगाव जिल्ह्यात मात्र, खरेदीदार हे दर पाडून मागणी करीत आहेत. शेतकऱ्यांनी विकण्यास नकार दिला तरी पुढचा खरेदीदारही त्याच तुलनेत मागणी करीत आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत. जळगाव वगळता राज्यात इतरत्र आणि परराज्यात केळीचे दर टिकून आहेत. येथे मात्र, व्यापाऱ्यांनी केळीचे दर पाडण्यासाठी एकी केली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.