मान्सूनच्या अनियमिततेचा फटका, खरिपाचं पेरणी क्षेत्र घटलं, 70 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण

| Updated on: Jul 19, 2021 | 11:15 AM

राज्यात अनेक भागात पुरेशा पावसाअभावी खरीप पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 11 टक्के क्षेत्रात खरीपची पेरणी कमी झाली आहे.

मान्सूनच्या अनियमिततेचा फटका, खरिपाचं पेरणी क्षेत्र घटलं,  70 टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण
महाराष्ट्रातील शेतकरी (फोटो प्रातनिधिक)
Follow us on

नागपूर: भारतीय हवामान विभागानं यंदाचा मान्सून सामान्य राहील, असा अंदाज वर्तवला होता. महाराष्ट्रात यंदा वेळेआधीच मान्सूननं हजेरी लावली. जून महिन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात पाऊस झाला. मात्र, नंतरच्या काळात पावसानं दडी मारली. सध्या राज्यात पुन्हा हजेरी लावलीय. मात्र, मान्सूनच्या अनियमिततेचा फटका शेती क्षेत्राला बसला आहे. राज्यात अनेक भागात पुरेशा पावसाअभावी खरीप पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे. राज्यातील खरिपाच्या पेरणी क्षेत्रात घट झाल्याचं समोर आलं आहे.

पेरणी क्षेत्र घटलं

राज्यात अनेक भागात पुरेशा पावसाअभावी खरीप पेरणीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 11 टक्के क्षेत्रात खरीपची पेरणी कमी झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत राज्यात अवघ्या 70 टक्के खरीप क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली होती. जून महिन्यात झालेल्या पावसात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचंही संकट ओढवल्याचं पाहायला मिळालं होतं.

कापूस आणि कडधान्यांचं क्षेत्र घटलं

मान्सूनच्या अनियमिततेचा फटका राज्यातील शेतीक्षेत्राला बसला आहे. महाराष्ट्रात गेल्यावर्षीच्या तुलनेत 15 टक्के कापूस लागवड कमी झाल्याचं समोर आलं आहे. राज्यात तूर, उडीद, मूग या कडधान्याचा पेरा 18 टक्के घटला आहे. लागवड क्षेत्र घटल्याने कडधान्य आणि कापूस उत्पादनावर परिणाम होणार आहे.

पीक विमा योजनेस मुदतवाढ

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती. त्यामागणीला राज्य सरकात्मक प्रतिसाद देत केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता. केंद्र सरकारनेही राज्य सरकारच्या विनंतीला मान देत पीक विमा योजनेत सहभागी होण्याची मुदत 23 जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं आहे ते त्यांच्या पीक विम्याच्या हप्त्याची रक्कम शेतकरी त्यांचं खातं असलेल्या बँकेच्या शाखा, प्राथमिक कृषी पतपुरठा व संस्था, पीक विमा पोर्टल आणि आपले सरकार सुविधा केंद्र या ठिकाणी भरु शकतात.

पीकनिहाय विमा संरक्षित रक्कम आणि विमा हप्ता रक्कम

भात पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 33 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. भात पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 660 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

ज्वारी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 16 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. ज्वारी पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 320 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

भुईमुग पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 31500 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल.भुईमुग पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 630 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 26 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. सोयाबीन पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 520 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

मुग आणि उडीद पिकासाठी विमा संरक्षित रक्कम 20 हजार रुपये आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना 2 टक्केनं विमा हप्ता भरावा लागेल. मुग आणि उडीद पिकासाठी शेतकऱ्यांना हेक्टरी 400 रुपये विमा हप्ता भरावा लागेल.

इतर बातम्या:

पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय, विम्याचा हप्ता किती, नोंदणी कधीपर्यंत सुरु, वाचा सविस्तर

PM Kisan : पीएम किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांच्या नावाची निवड कशी होते? वाचा सविस्तर

Kharaip 2021 due to lack of consistance monsoon rain Kharip cultivation area reduced