राज्यात खरिपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण, दमदार मान्सूनची प्रतीक्षा, दादाजी भुसे यांची माहिती

| Updated on: Jul 13, 2021 | 4:02 PM

कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास 70 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती दिली. 

राज्यात खरिपाच्या 70 टक्के पेरण्या पूर्ण, दमदार मान्सूनची प्रतीक्षा, दादाजी भुसे यांची माहिती
दादा भुसे
Follow us on

मुंबई: कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने कालपर्यंत खरीपाच्या 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास 70 टक्के पेरणी झाली असल्याची माहिती दिली.  अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. पीक पेरणी व पीक वाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.

12 जुलैपर्यंत राज्यात 368 मिमी. पावसाची नोंद

राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद झाली असून कोकण विभागात मुसळधार पाऊस होत आहे. औरंगाबाद, लातूर, अमरावती व नागपूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पुणे व कोल्हापूर विभागात बहुतांश ठिकाणी नाशिक विभागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. 12 जुलैपर्यंत राज्यात 368 मिमी. पाऊस झाला आहे.

खरिपाचं 151.33 लाख हेक्टर क्षेत्र

राज्यात ऊस पिकासह खरीपाचे क्षेत्र 151.33 लाख हेक्टर आहे. गेल्या आठवड्यापासून पर्जन्यमानास सुरुवात झाल्याने पेरणीची खोळंबलेली कामे सुरु झाली आहे. काही ठिकाणी पेरणी झालेली ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सुर्यफूल, सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, तीळ व कारळे ही पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहे, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

लातूर विभागात सर्वाधिक पेरणी

कोकण विभागात खरीपाचे 4.42 लाख हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी 0.98 लाख हेक्टर (22.17 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नाशिक विभागात 21.19 लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी 11.26 लाख हेक्टर (53.12 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पुणे विभागात 8.67 लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून आतापर्यंत 6.41 लाख हेक्टर (73.99 टक्के) पेरणी झाली आहे. कोल्हापूर विभागात खरीपाचे क्षेत्र 8.03 लाख हेक्टर असून 6.73 लाख हेक्टर (83.77 टक्के) पेरणी झाली आहे.

औरंगाबाद विभागात 20.23 लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र असून त्यापैकी 17.52 लाख हेक्टर (86.60 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. लातूर विभागात खरीपाचे क्षेत्र 27.94 लाख हेक्टर असून त्यापैकी 24.28 लाख हेक्टर (86.90 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. अमरावती विभागात 32.24 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 26.29 लाख हेक्टर (81.55 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. नागपूर विभागात 19.26 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 11.29 लाख हेक्टर (58.65 टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे, असे कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

राज्यात अद्यापही काही भागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असून खरीपाशी निगडीत कामांबाबत कृषी विभाग लक्ष ठेवून आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचनादेखील देण्यात येत असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

इतर बातम्या:

जरंडेश्वर प्रकरणी ईडीची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला नोटीस आली का? बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी नेमकं काय सांगितलं?

Video : मध्यप्रदेशसह विदर्भात पावसाची बॅटिंग, हतनूर धरणाच्या 16 दरवाज्यातून दुसऱ्या दिवशी विसर्ग सुरु

(Maharashtra Agriculture Minister Dadaji Bhuse said seventy percent cultivation of Kharip is completed by Farmers)