
पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी आता आधुनिक आणि नगदी पीक देणाऱ्या शेतीकडे वळू लागले आहेत. थोडसं पाणी उपलब्ध असलं तरी चांगलं नियोजन केलं तर चांगल्या उत्पन्नाचे पीक घेता येऊ शकते, याच उत्तम उदाहरण समोर आले आहे. अहिल्यानगरच्या भोसे येथील अशोक टेमकर यांनी हे दाखवून दिलं आहे. टेमकर यांच्याकडे असलेल्या संत्रा बागेच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. अडीच एकरवर असलेली संत्राबाग त्यांना वर्षाला दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा देत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील भोसेगाव परिसरात साडेतीनशे ते चारशे मिली पाऊस पडतो. कमी पाऊस असल्यामुळे या भागातील शेतकरी पारंपारिक खरीपाची पिके घेतात. मात्र मागील काही वर्षांपासून भोसे गावातील शेतकरी फळबागांकडे वळले आहेत. प्रत्येक शेतकऱ्याकडे छोटी-मोठी फळबाग आहे. यात डाळिंब आणि संत्रा बाग या भागात जास्त पाहायला मिळते. अशोक टेमकर यांची 16 एकर शेती आहे. यातील अडीच एकरवर त्यांनी साडेसातशे संत्र्याची झाड लावली आहेत. बारा बाय बारा अंतरावर असलेल्या या संत्रा झाडांमधून त्यांना सरासरी 40 ते 60 किलो संत्र्याचे उत्पन्न मिळत आहे. एक वेळेस पीक घेण्यासाठी साधारण अडीच ते तीन लाख रुपयापर्यंत खर्चही येतो. यावर्षी संत्रा बागेतून त्यांना दहा लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला आहे.
या परिसरात बागांची संख्या वाढल्यामुळे गावातच व्यापारी देखील तयार झाले आहेत. त्या परिसरातील बागांमध्ये मिळणारी फळ दर्जेदार असल्यामुळे त्यांना चांगली मागणी आहे. मुंबई दिल्ली या बाजारासोबतच दक्षिणेकडील बाजारातही या फळांना मागणी असते. सध्या चांगला भाव असल्यामुळे व्यापाऱ्यांना देखील चांगला नफा मिळत आहे.
पारंपारिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पिकासाठी खर्च केलेले पैसेही मिळणं शेतकऱ्यांना अवघड होतं. अशात आधुनिक शेतीची कास धरत आपल्याकडे असलेल्या साधनसामग्रीच्या जोरावर चांगली पिके घेता येऊ शकतात. यातून चांगलं उत्पन्नही मिळवता येतं. थोडं पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी आता फळबागांकडे वळल्यास त्यांचा फायदा होईल यात शंका वाटत नाही.