ठरलं तर मग, आता बाजार समित्यांमध्ये 50 किलो वजनाचीच गोणी, प्रशासन अन् संघटनांच्या बैठकीत निर्णय

| Updated on: Nov 19, 2021 | 6:03 PM

बाजार समितीमध्ये दाखल होणाऱ्या गोणीचे वजन किती असावे यावरुन समिती प्रशासक आणि संघटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद होते. अखेर तिसऱ्या दिवशी यावर तोडगा निघाला असून आता 50 किलोचीच गोणी उतरुन घेतली जाणार आहे. गेल्या दीड वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. शुक्रवारी या प्रश्नावर बाजार समितीमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करून तोडगा काढण्यात आला.

ठरलं तर मग, आता बाजार समित्यांमध्ये 50 किलो वजनाचीच गोणी, प्रशासन अन् संघटनांच्या बैठकीत निर्णय
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
Follow us on

नवी मुंबई : बाजार समितीमध्ये दाखल होणाऱ्या गोणीचे वजन किती असावे यावरुन समिती प्रशासक आणि संघटनांमध्ये गेल्या काही दिवसांपासून मतभेद होते. अखेर तिसऱ्या दिवशी यावर तोडगा निघाला असून आता 50 किलोचीच गोणी उतरुन घेतली जाणार आहे. गेल्या दीड वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता. शुक्रवारी या प्रश्नावर बाजार समितीमध्ये विशेष बैठकीचे आयोजन करून तोडगा काढण्यात आला. तर शेतकरी आणि 305 बाजार समित्यांमध्ये जनजागृतीसाठी कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. ज्या भागातून 50 किलोपेक्षा अधिक वजनाच्या गोणी येतात त्या ठिकाणी जाऊन याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

गोणी वजनाबाबत सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीची अंमलबजावणी केली जात नव्हती. त्यामुळे माथाडी कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अखेर या प्रश्नावर तोडगा निघाला असून आता याबाबत सर्व बाजार समित्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

तीन दिवसांपासून होते आंदोलन सुरु

कांदा, बटाठ्याच्या गोणीचे वजन 50 किलोपेक्षा जास्त असू नये असा नियम शासनाने केला आहे. या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केली होती. या मागणीसाठी मागील तीन दिवसांपासून आंदोलन सुरू होते. त्यामुळे जादा वजनाच्या गोणी ट्रकमधून खाली करण्यात आल्या नाहीत. परिणामी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा-बटाटा गाडीत पडून राहिला. बाजार आवारातील व्यापार पूर्णपणे ठप्प झाला होता.

काय झाले बैठकीत?

मुंबई बाजार समिती आणि संघटना यांच्यामध्ये शुक्रवारी बैठक पार पडली. 15 डिसेंबर नंतर अधिक वजनाचा माल उतरून घेतला जाणार नाही हे धोरण निश्चित करण्यात आले. तसेच ज्या ठिकाणाहून अधिक वजनाचा माल येतो. त्यांनाही आता नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याचे सांगण्यात आले होते. तसेच याबाबत उपमुख्यमंत्री, पणनमंत्री, पणन संचालक याच्या समवेत बैठक घेण्यात येणार असल्याचे सभापती अशोक डक यांनी सांगितले. राज्यातील संपूर्ण बाजार समित्यांसह शेतकऱ्याला 50 किलो पेक्षा अधिक वजनाची गोणी न भरण्याचे आवाहन करण्यात आले. माथाडी कामगारांनी आजच्या पूर्व परिस्थितीत काम करण्याचा बैठकीत हा निर्णय घेतला.

इतर जिल्ह्यांच्या दृष्टीनेही बैठकीत निर्णय

गोणीतील शेतीमालाच्या वजनाबाबत वेळोवेळी बैठका घेऊन 70 ते 75 किलो वजनाचा माल 50 किलोत आणण्यासाठी व्यापाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत. परंतू पुणे, संगमनेर व सोलापूर येथून येणारा माल सुद्धा 50 किलोमध्ये आला पाहिजे याकिरता ही बैठक महत्वपूर्ण ठरली. याबाबत व्यापाऱ्यांना कोणतीच अडचण नाही. कामगार युनियन आणि व्यापाऱ्यांमध्ये समेट घडून आला असून 15 डिसेंबर नंतर 50 किलोपेक्षा अधिक माल न उरवण्याचा निर्णय झाल्याचे व्यापारी प्रतिनिधी आणि मार्केट संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

कांदा बीजोत्पातदन पध्दती, उत्पादन वाढविण्यासाठी महत्वाची प्रक्रिया

शेतकरी उत्पादक कंपन्यांचा असा ‘हा’ फायदा, शेतीमालाची विक्री अन् मोबदला एकाच जागी

रिलायन्स विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांविरोधात पहिला गुन्हा परभणीत, बुलढाण्यात काय होणार?