
देशातील करोडो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजारांची आर्थिक मदत केली जाते. हा मदत 2-2 हजारांच्या 3 हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी बियाणे आणि इतर गोष्टी खरेदी करण्यासाठी मदत होते. केंद्र सरकारने आतापर्यंत या योजनेचे 21 हप्ते यशस्वीरित्या शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. आता लवकरच 22 वा हप्तादेखील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या हप्त्याच्या तारखेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजेनेचे हप्ते वर्षातून तीन वेळा वितरित केले जातात. एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च या काळावधीत हे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. या योजनेचा मागील हप्ता नोव्हेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आला होता. त्यामुळे आता 22 वा हप्ता डिसेंबर ते मार्च दरम्यान येण्याची शक्यता आहे. आता असा अंदाज वर्तवला जात आहे की, सरकार 22 वा हप्ता मार्च 2026 मध्ये किंवा एप्रिल 2026 च्या सुरुवातीला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे.
1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत, त्यावेळी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता आहे. सध्या पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये मिळतात, मात्र हा निधी वाढवण्याची घोषणा अर्थसंकल्पात केला जाण्याची शक्यता आहे. कारण महागाई आणि शेती खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे या रकमेत वाढ करण्याची मागणी केली जात आहे. त्यामुळे याबाबत आता आगामी अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असा निर्णय झाल्यास देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
याआधी अनेकदा असं घटलं आहे की पीएम किसानचा हप्ता जारी झाल्यानंतरही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पोहोचत नाही. कारण त्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नसते. आता सरकारने स्पष्ट केले आहे की ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यांनाच पुढील हप्त्याचा लाभ मिळेल. त्यामुळे तुम्ही तात्काळ ई केवायसी करून घ्या.