Beed : शिंदे सरकार मुख्य शहरांपुरतेच, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले? आंबादास दानवेंचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या गावातूनच सवाल..!

| Updated on: Sep 04, 2022 | 5:55 PM

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील समनापूर येथे नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. राज्यात शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. सरकारला याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही.

Beed : शिंदे सरकार मुख्य शहरांपुरतेच, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले? आंबादास दानवेंचा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या गावातूनच सवाल..!
शिंदे सरकारवर अंबादास दानवे यांची टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बीड : एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच, हा (Farmer) महाराष्ट्र शेतकरी आत्महत्या मुक्त करण्याचे धोरण आखले जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र, गेल्या दीड महिन्यातही (Farmer suicides) शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. उलट यामध्ये वाढ झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर हे शिंदे सरकार मुंबई, ठाणे आणि पुणे या प्रमुख शहरांपुरतेच मर्यादीत असून उर्वरित राज्यात काय सुरु आहे? याचे काही देणेघेणे त्यांना राहिलेले नाही. शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राचे काय झाले असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते (Ambadas Danve) आंबादास दानवे यांनी बीड जिल्ह्यात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या गावातूनच मुख्यमंत्री यांना विचारलेला आहे.

आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेट

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवे हे बीड जिल्हा दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यात आगमन होताच त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. तालुक्यातील समनापूर येथे नवनाथ शेळके या शेतकऱ्याने विष प्राशन करुन आपले जीवन संपवले होते. राज्यात शेतकरी आत्महत्या ह्या सुरुच आहेत. सरकारला याचे काही सोयरसुतक राहिलेले नाही. केवळ स्वार्थापोटी हे सरकार सत्तेत आले असल्याचा आरोपही त्यांनी केला.

आश्वासनाचे काय झाले?

सरकारची स्थापना होताच मुख्यमंत्र्यांनी हा महाराष्ट्र शेतकरी आत्महत्यामुक्त केला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानानंतरच मराठवाड्यात आणि राज्यात शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. कुठे आहे धोरण..? आणि कुठे आहे सरकारचे आश्वासन असा सवाल उपस्थित करीत दानवे यांनी मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिले होते, त्याची आठवणच करुन दिली.

बुलेट ट्रेनमध्ये अडकले सरकार

घोषणा शेतकऱ्यांच्या बाबतीत आणि निर्णय मात्र मेट्रोचे असे हे सरकार आहे. मध्यंतरी अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईबाबत केवळ घोषणा झाल्या. प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेच जमा झालेले नाही. शिवाय या सरकारने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोणते असे धोरण राबवले असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला आहे.

पक्ष संघटनेसाठी दानवे बीडमध्ये..!

शिवसेनेतील बंडाचा परिणाम बीड जिल्ह्यावरही झाला आहे. येथील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याअनुशंगानेच आंबादास दानवे हे बीड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवसैनिकांची भेट घेऊन दौऱ्याला सुरवात केली आहे. शिवसेनेतून शिंदे गटात होत असलेले आऊटगोइंग थोपवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे.