
सध्याच्या डिजिटल युगात मोबाईल फोन हे प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहेत. मात्र, अनेक वेळा चार्जिंगचा प्रश्न निर्माण होतो विशेषतः जेव्हा आपण बाहेर असतो, प्रवासात असतो किंवा विजेचा तुटवडा असतो. या समस्येवर एक अवघ्या १५ वर्षाच्या विद्यार्थ्याने अभिनव उपाय शोधून काढला आहे. फिलिपाईन्समधील अँजेलो कॅसिमिरो या विद्यार्थ्याने ‘स्मार्ट शू इनसोल्स’ तयार केले आहेत जे चालताना फोन चार्ज करू शकतात.
या इनोवेशनमुळे सध्या सोशल मीडियावर अँजेलोचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. त्याने तयार केलेल्या या स्मार्ट इनसोल्समध्ये ‘पिझोइलेक्ट्रिक मटेरियल’ वापरण्यात आले आहे, जे चालताना किंवा धावताना होणाऱ्या दाबामुळे ऊर्जा निर्माण करते. ही ऊर्जा एका छोट्या सर्किटमध्ये साठवली जाते आणि तिथून ती USB पोर्टमार्फत मोबाइल फोन किंवा इतर छोट्या गॅझेट्स चार्ज करण्यासाठी वापरली जाते.
या स्मार्ट शूजचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा पोर्टेबलपणा आणि स्वयंचलित ऊर्जा निर्मिती. अँजेलोने सांगितले की, त्याची ही संकल्पना विशेषतः अशा लोकांसाठी आहे, जे प्रवासात असतात, जे ट्रेकिंग करतात किंवा ग्रामीण भागात राहतात जिथे वीजपुरवठा नियमित नसतो. या इनसोल्सच्या चाचणीमध्ये असे दिसून आले की, दोन तास बास्केटबॉल खेळल्यानंतर १० मिनिटे फोन वापरण्यासाठी आवश्यक इतकी ऊर्जा तयार होते.
या इनोवेशनचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते पर्यावरणस्नेही आहे. सौरऊर्जेप्रमाणेच हे एक अक्षय ऊर्जा स्रोत मानला जातो, कारण ही ऊर्जा चालताना निर्माण होते आणि कोणत्याही इंधनाचा वापर होत नाही. त्यामुळे ही तंत्रज्ञान पर्यावरणासाठीही फायदेशीर ठरते.
अँजेलोच्या या स्मार्ट शूजची संकल्पना भविष्यातील टेक्नॉलॉजीचे उदाहरण मानली जात आहे. सोशल मीडियावर त्याच्या शोधाचे कौतुक करताना अनेकांनी लिहिले आहे की, अशा कल्पक मुलांकडून खऱ्या अर्थाने ‘ग्रीन टेक्नॉलॉजी’ पुढे येईल. भविष्यात ही संकल्पना व्यावसायिक स्तरावर पोहोचून लाखो लोकांसाठी उपयोगी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सतत फोन चार्जिंगच्या समस्येवर एक सोपी, पर्यावरणपूरक आणि स्वयंचलित उपाययोजना एका १५ वर्षाच्या मुलाने शोधून काढली आहे. अँजेलो कॅसिमिरोने तयार केलेले हे स्मार्ट शू इनसोल्स केवळ तांत्रिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठरू शकतात. या शोधामुळे भविष्यकाळातील स्मार्ट वियरअबल डिव्हाइसेसच्या दृष्टीने एक नवा मार्ग खुला झाला आहे.