
भारतातील पहिली बॅटरी इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटारा लाँच करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील हंसलपूरमध्ये मारुती सुझुकी प्लांटला भेट दिली. यावेळी मोदींनी मारुतीच्या पहिल्या बॅटरी इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटाराला हिरवा झेंडा दाखवला. चला तर मग याविषयीची माहिती पुढे विस्ताराने जाणून घेऊया.
भारताने आज एका नव्या युगात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 26 ऑगस्ट 2025 रोजी गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील हंसलपूर येथील मारुती सुझुकी प्लांटला भेट दिली आणि यावेळी मारुतीच्या पहिल्या बॅटरी इलेक्ट्रिक एसयूव्ही ई-विटाराला हिरवा झेंडा दाखवला. यासोबतच कंपनीचे नवीन इलेक्ट्रिक वाहन युनिटही सुरू झाले आहे.
ही एसयूव्ही केवळ भारतीय बाजारपेठेसाठीच नसेल तर जपान आणि युरोपसह 100 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाईल. त्याची पहिली बॅच आजपासून प्रॉडक्शन लाइनमधून बाहेर पडू लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये लिहिले आहे की, आजचा दिवस भारताच्या आत्मनिर्भरतेच्या दिशेने आणि ग्रीन मोबिलिटी हब बनण्याच्या दिशेने खूप खास आहे. हंसलपूर येथे झालेल्या कार्यक्रमात ई-विताराला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हे विधान केवळ मेक इन इंडियाला बळकटी देत नाही, तर शाश्वत गतिशीलतेच्या दिशेने भारताची ओळख वाढवते.
मारुती ई विटारा लिथियम आयर्न-फॉस्फेट (एलएफपी) बॅटरी पॅकसह येते. कंपनीने याला दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅकसह सादर केले आहे. ज्यात 49 किलोवॅट आणि 61 किलोवॅट चा समावेश आहे. या एसयूव्हीमध्ये 18 इंचाची अलॉय व्हील्स आहेत. कारची लांबी 4,275 मिमी, रुंदी 1,800 मिमी आणि उंची 1,635 मिमी आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही एसयूव्ही सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटरपेक्षा जास्त रेंज देईल. नव्या मारुती ई-विटाराचा लूक आणि आकार गेल्या वर्षी सादर करण्यात आलेल्या मारुती ईव्हीएक्स या संकल्पनेसारखाच आहे.
या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदीयांनी गुजरातमधील टीडीएस लिथियम-आयन बॅटरी प्लांटमध्ये हायब्रीड बॅटरी इलेक्ट्रोडचे उत्पादन देखील सुरू केले आहे. आता 80 टक्क्यांहून अधिक बॅटरी भारतातच तयार केल्या जाणार आहेत. हे पाऊल भारताच्या बॅटरी इकोसिस्टमला पुढील पातळीवर नेईल आणि परदेशी अवलंबित्व कमी करेल.
यावेळी पंतप्रधान मोदींनी कारने भरलेल्या मालगाडी सेवेला हिरवा झेंडा दाखवला. सध्या हंसलपूर प्रकल्पातून रेल्वेमार्गे दररोज 600 हून अधिक गाड्या पाठविल्या जातात. सध्या येथून दररोज तीन गाड्या धावत आहेत, ज्या देशभरात मारुती वाहनांचा पुरवठा करतात.