महिंद्राच्या ‘या’ कारला आहे सर्वाधिक मागणी, विक्रीत एक्सयुव्ही 700 अन्‌ थारलाही टाकले मागे

| Updated on: Jul 12, 2022 | 1:49 PM

जूनमध्ये महिंद्राने एकूण 26640 कार्सची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत महिंद्राने जवळपास 10 हजार जास्त गाड्यांची विक्री केली आहे. आकड्यांबाबत बोलायचे झाल्यास, महिंद्राने आपल्या गाड्यांच्या विक्रीमध्ये 60 टक़्क्यांची ग्रोथ मिळविली आहे.

महिंद्राच्या ‘या’ कारला आहे सर्वाधिक मागणी, विक्रीत एक्सयुव्ही 700 अन्‌ थारलाही टाकले मागे
Mahindra Bolero
Image Credit source: Social Media
Follow us on

महिंद्रा (Mahindra) आपल्या एसयुव्ही कारच्या निर्मितीसाठी सर्वाधिक लोकप्रिय आहे. महिंद्राच्या पोर्टफोलियोमध्ये एकापेक्षा एक एसयुव्ही कारचा समावेश आहे. या यादीमध्ये जुनी स्कॉर्पिओ, नवीन स्कॉर्पियो एन, थार, एक्सयुव्ही 700 आणि कॉम्पॅक्ट एसयुव्ही (Compact SUV) एक्सयुव्ही 300 सारख्या कार्सच्या नावांचा समावेश आहे. जूनमध्ये महिंद्राने आपल्या गाड्यांची तुफान विक्री केली आहे. जूनमध्ये महिंद्राने एकूण 26640 कार्सची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत महिंद्राने जवळपास 10 हजार जास्त गाड्यांची विक्री केली आहे. आकड्यांबाबत बोलायचे झाल्यास, महिंद्राने आपल्या गाड्यांच्या विक्रीमध्ये 60 टक़्क्यांची ग्रोथ मिळविली आहे. महिंद्राने नुकतीच आपली नवीन स्कॉर्पियो एन (Scorpio N) लाँच केली आहे. ग्राहकांकडून या नवीन स्कॉर्पियोलाही चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे.

बोलेरो

महिंद्राची सर्वाधिक विक्री होणारी कार बोलेरो आहे. गेल्या जूनमध्ये महिंद्राने 7884 बोलेरो कार्सची विक्री केली आहे. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये कंपनीने यंदा 2140 कार्स जास्तीच्या विक्री केल्या आहेत. महिंद्राच्या एकूण कार विक्रीमध्ये बोलेरोचा एकूण हिस्सा तब्बल 29.59 टक्के इतका आहे.

एक्सयुव्ही 700

महिंद्राची दुसरी सर्वाधिक विक्री होणार्या कारचे नाव एक्सयुव्ही 700 आहे. महिंद्राने जूनमध्ये 6022 कारची विक्री केली होती. एक्सयुव्ही 700 महिंद्राची प्रीमिअम कार आहे. महिंद्राची एकूण कार्सच्या विक्रीमध्ये या कारचा वाटा 22.61 टक़्के इतका आहे.

एक्सयुव्ही 300

महिंद्राच्या सर्वाधिक विक्री होत असलेल्या कारमध्ये तिसर्या क्रमांकावर एक्सयुव्ही 300 आहे. ही एक कॉम्पॅक्ट एक्सयुव्ही कार आहे. कंपनीने जून महिन्यात एकूण 4754 एक्सयुव्ही 300 कारची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये कंपनीने 139 एक्सयुव्ही 300 कार जास्तीच्या विक्री केल्या होत्या.

स्कॉर्पियो

महिंद्राच्या पोर्टफोलियोमध्ये सर्वाधिक दमदार कार स्कॉर्पियो मानली जाते. कंपनीने जूनमध्ये नवीन स्कॉर्पियो एन लाँच केली होती. जूनमध्ये महिंद्राने एकूण 4131 स्कार्पियो कार युनिट्‌सची विक्री केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 29 कार कमी विकल्या गेल्या आहेत. एकूण विक्रीमध्ये स्कॉर्पियाचा वाटा 15.51 टक्के आहे.

थार

कंपनीने जूनमध्ये 3640 थारची विक्री केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत 2575 थारची जास्त विक्री झाली आहे. ही वाढ तब्बल 241 टक्के जास्त आहे. महिंद्राच्या एकूण कार्सच्या विक्रीमध्ये थारचा वाटा 13.66 टक़्के इतका आहे.