टॅरिफचा असाही फटका, भारताची टेस्लाला नकार घंटा, विक्रीला थंडा प्रतिसाद

इलॉन मस्क यांच्या टेस्लाचे शोरुम मुंबई, दिल्ली अशा ठिकाणी उघडल्यानंतर बघ्यांनी शोरुममध्ये मोठी गर्दी केली. परंतू ही गर्दी विक्रीत परिवर्तित होऊ शकलेली नाही. आयात शुल्काचाही परिणाम टेस्लाच्या विक्रीवर झालेला आहे.

टॅरिफचा असाही फटका, भारताची टेस्लाला नकार घंटा, विक्रीला थंडा प्रतिसाद
| Updated on: Sep 03, 2025 | 5:45 PM

टेस्ला इलेक्ट्रीक कारची क्रेझ भारतात मोठी असल्याने या गाड्यांची विक्री चांगली होईल असे म्हटले जात होते. परंतू भारतात टेस्ला आल्यानंतर अपेक्षेपेक्षा खूपच कमी कार विकल्या गेल्या आहेत. जुलैनंतर या कारची भारतात विक्री सुरु झाली असली तर आतापर्यंत ६०० हून थोड्या अधिक कार विकल्या गेल्या आहेत. ही संख्या कंपनीच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहेत.टाईम्सच्या वृत्तानुसार टेस्लाला यावर्षी भारतात २,५०० कारची विक्री होईल असे वाटले होते. परंतू आता केवळ ३५० ते ५०० कार भारतात पाठवण्याची योजना आखत आहेत. यापैकी पहिली बॅच सप्टेंबरच्या सुरुवातीला शांघाईतून भारतात येणार आहे.

या कार केवळ मुंबई, दिल्ली, पुणे आणि गुरुग्राममध्ये डिलिव्हरी होतील. कारण टेस्लाचे शोरुम आणि सुविधा सध्या केवळ या शहरात आहेत. नेमक्या किती लोकांनी पेमेंट पूर्ण केले आहे आणि कंपनी या चार शहरांच्या बाहेर डिलिव्हरी करु शकणार आहे की नाही यावर या गाड्यांच्या डिलिव्हरी साईज ठरणार आहे.

भारतात टेस्लाची सर्वात स्वस्त कार, मॉडेल वायची किंमत ६० लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.ही किंमत भारतातील बहुतांश इलेक्ट्रीक वाहन खरेदीकरणाऱ्यांसाठी खूपच जास्त आहे. कारण बहुतांश इलेक्ट्रीक कार २२ लाख रुपयांच्या आसपास भारतात मिळत आहे. यात सर्वात मोठे कारण भारतातील आयात शुल्क, जे ११० टक्क्यांपर्यंत असू शकते.

टॅरिफचा परिणाम –

त्यामुळे टेस्लाची कार सर्वसामान्य भारतीय ग्राहकांच्या आवाक्यांच्या बाहेर गेलेली आहे. भारतात इलेक्ट्रीक कारची एकूणविक्री केवळ ५ टक्के आहे. कंपनीला मोठी आशा होती की टेस्लाचा ब्रँड आणि अमेरिकेसोबतचे चांगले संबंध भारतात त्यांच्या प्रवेश सुकर करतील. परंतू असे झालेले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि टेस्लाचे मालक इलॉक मस्क यांच्या दरम्यानचे संबंध बिघडलेले आहेत.भारत आणि अमेरिकेच्या दरम्यान व्यापारी नात्यात तणाव आहे. कारण ट्रम्प यांनी भारतातील निर्यातीवर ५० टक्के शुल्क लावले आहे. त्यामुळे टेस्लाला स्वस्तात कार विकणे कठीण गेले आहे.

भारतात टेस्ला प्रसार वाढवणार

भारतात टेस्ला स्टोर्समध्ये लोकांनी गर्दी तर खूप केली. परंतू ती विक्रीत वाढली नाही. टेस्ला जाहीरात करीत नाही तर तिच्या ब्रँडच्या ताकदीवर भरोसा करते. इतर कार कंपन्या भारतीय बाजारात जाहिरातींवर भर देतात. टेस्ला यात कमी पडली आहे. हळूहळू टेस्ला भारतात पाय पसरत आहे. मुंबई आणि दिल्लीत त्यांनी सुपरचार्जर स्टेशन बनवले आहेत,२०२६ पर्यंत द.भारतात टेस्ला नवीन एक्सपिरियन्स सेंटर उघडणार आहे.टेस्लाची चीनी स्पर्धक बीवायडीने भारतात चांगली कामगिरी केली आहे.२०२५ च्या पहिल्या सहामाहीत बीवायडीने सिलायन ७ एसयुव्हीच्या १२०० हून जास्त कार विकल्या आहेत. त्यांची किंमत ४९ लाख रुपये आहे. टेस्लाला भारतात आव्हाने आहेत कारण त्यांची मुख्य विक्री अमेरिका आणि चीनमध्ये घसरली आहे.गेल्या तिमाहीत त्यांची विक्री १३ टक्के घटली आहे. लागोपाठ दुसऱ्या वर्षी विक्री कमी झाली आहे.