
बाईक घेण्याचा प्लॅन आहे का? असं असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास बाईक्सची माहिती सांगणार आहोत, ज्यांच्या किमती खूप कमी झाल्या आहेत. आता या नेमक्या कोणत्या बाईक्स आहे, चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.
सरकारने GST कमी केल्याने देशातील वाहनांच्या किमती कमी झाल्या आहेत. GST चे नवे स्लॅब 22 सप्टेंबरपासून लागू होतील. GST कमी करण्याच्या घोषणेनंतर अनेक कंपन्यांनी आपल्या वाहनांच्या किमती कमी करण्याची घोषणाही केली आहे.
आम्ही तुम्हाला टाटा, महिंद्रा, रेनॉसह अनेक कंपन्यांच्या नवीन रेट लिस्टबद्दल सांगितले आहे. आज आम्ही तुम्हाला जावा आणि येज्दी बाईकच्या किंमतीत झालेल्या कपातीबद्दल सांगणार आहोत. GST कमी झाल्याने या कंपन्यांच्या बाईकच्या किमतीही लक्षणीय रित्या कमी झाल्या असून अनेक बाईक्सची किंमत दोन लाख रुपयांपेक्षाही कमी झाली आहे.
देशातील वाहनांवरील GST मध्ये सरकारने कपात केली आहे. नव्या बदलांनुसार 350 cc पेक्षा कमी क्षमतेच्या बाईकवरील GST 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला आहे. 10 टक्के कर कपातीमुळे बाईकच्या किमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत. जावा आणि येज्दी बाईक भारतात परत आणणाऱ्या क्लासिक लिजेंड्सने आपल्या सर्व बाईकच्या किंमतीत बदल करण्याची घोषणा केली आहे. बहुतांश मॉडेल्स आता 2 लाख रुपयांपेक्षा कमी (एक्स-शोरूम) किंमतीत उपलब्ध आहेत.
या करकपातीचा थेट फायदा जावा आणि येझदी बाईकला झाला आहे, कारण त्यांच्याकडे 293 cc आणि 334cc लिक्विड कूल्ड अल्फा 2 इंजिन आहेत. 334cc चे इंजिन 29 पीएस पॉवर आणि 30 एनएम टॉर्क जनरेट करते, जे आपल्या सेगमेंटमधील सर्वात पॉवरफुल आहे. GST कपातीचा संपूर्ण फायदा कंपनीने ग्राहकांना दिला आहे. आता येझदी अॅडव्हेंचर, रोडस्टर, स्क्रॅम्बलर आणि जावा 42 बॉबर सारखी मॉडेल्स परफॉर्मन्स आणि क्लासिक बाईक हव्या असलेल्या रायडर्ससाठी अधिक परवडणारी झाली आहेत.
जावा 42 ही बाईक कंपनीने ऑफर केली आहे. यापूर्वी याची किंमत 1,72,942 रुपये होती, परंतु GST कमी केल्यानंतर आता त्याची किंमत 1,59,431 रुपये करण्यात आली आहे. दुसरी बाईक जावा 350 ची किंमत आधी 1 लाख 98 हजार 950 रुपये होती, पण आता ती 1 लाख 83 हजार 407 रुपयांना उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे जावा 42 बॉबरची किंमत आधी 2,09,500 रुपये होती, आता ही बाईक 1,93,133 रुपयांना मिळणार आहे. जावा 42 ड्युअल टोनची किंमत आधी 2,10,142 रुपये होती, ती आता 1,93,725 रुपये झाली आहे. जावा पेराकची किंमत आधी 2,16,705 रुपये होती, ती आता 1,99,775 रुपये झाली आहे.