टाटा पंचला टक्कर देण्यासाठी मास्टरप्लॅन, मारुतीची SUV करणार मार्केटजाम; काय आहेत फिचर्स अन् खासियत?
सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी, मारुती सुझुकीने टाटा पंचला टक्कर देण्यासाठी पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये एक पूर्णपणे नवीन मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखत आहे.

Maruti Y43 Tata Punch Rival: टाटा कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय गाडी म्हणजे पंच. ऑक्टोबर 2021 मध्ये लॉन्च झालेल्या पंचने विक्रीचे अनेक रेकॉर्ड मोडत ऑटोक्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. आत्तापर्यंत टाटा पंचच्या तब्बल 8 लाखांहून अधिक युनिट्सच्या विक्रीचा टप्पा पार केला आहे. टाटा पंचच्या या यशाने ऑटो क्षेत्रात खळबळ उडाली आहे. अशातच आता टाटा पंचला टक्कर देण्यासाठी मारुती सुझुकी मैदानात उतरली असून नवी जबदस्त कार लॉन्च करणार आहे.
टाटा पंचला टक्कर देणार मारुतीची नवी कार..!
देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी, मारुती सुझुकीने टाटा पंचला टक्कर देण्यासाठी पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये एक पूर्णपणे नवीन मॉडेल लॉन्च करण्याची योजना आखत आहे. मारुती सुझुकीने जानेवारी 2017 मध्ये लॉन्च केलेल्या इग्निसद्वारे मायक्रो-एसयूव्ही सेगमेंटमध्ये खूप लवकर प्रवेश केला होता, परंतु या मॉडेलला बाजारातून फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
यामुळे, कंपनीने 2026 च्या सुरुवातीला त्याचे उत्पादन बंद केले आणि आता अधिक स्पर्धात्मक मॉडेल विकसित करण्यावर काम करत आहे. कंपनीच्या अंतर्गत सूत्रांनुसार, या नवीन मॉडेलला ‘मारुती वाय43’ (Maruti Y43) असे सांकेतिक नाव देण्यात आले आहे. टाटा पंचला टक्कर देणारे हे वाहन पूर्णपणे नव्याने डिझाइन केले जात आहे आणि ते एका संपूर्ण नवीन प्लॅटफॉर्मवर आधारित असू शकते.
नवीन मारुती Y43 ही सुझुकीच्या जपानी बाजारपेठेसाठी डिझाइन केलेल्या ‘केई’ कार्सपासून प्रेरित असण्याची शक्यता आहे. या मॉडेलचा एक टेस्ट म्युल या वर्षी ऑगस्टमध्ये मारुती सुझुकीच्या नवीन प्लांटमध्ये दिसला होता.. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंमधून चौकोनी डिझाइन, सपाट, वरच्या दिशेने वळलेले बोनेट आणि सरळ पुढचा भाग (फ्रंट नोज) असल्याचे दिसून येते.
दमदार फिचर्स अन् बरंच काही!
ही कार अत्यंत आधुनिक असेल. मारुती Y43 मध्ये सनरूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, 50 वॅटपेक्षा जास्त आउटपुट असलेले फास्ट यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्ट्स, क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असण्याची शक्यता आहे. सुरक्षेसाठी, यात एलईडी फ्रंट फॉग लॅम्प्स, सहा एअरबॅग्ज आणि अरुंद जागेत सहज पार्किंगसाठी 360-डिग्री कॅमेरा सिस्टीम असू शकते.
परफोर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, मारुती सुझुकी आपल्या नवीन Y43 मध्ये नवीन Z12E 1.2-लिटर नॅचरली ॲस्पिरेटेड तीन-सिलेंडर इंजिन देण्याची शक्यता आहे. ही कार पेट्रोल आणि पेट्रोल-सीएनजी या दोन्ही प्रकारांमध्ये उपलब्ध असेल. ग्राहकांना दोन्ही इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड एएमटी ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळेल. हे Z12E इंजिन पेट्रोलवर 82 hp आणि 112.4 Nm टॉर्क निर्माण करेल, तर सीएनजीवर चालताना ते 69 hp आणि 101.8 Nm टॉर्क देईल. याव्यतिरिक्त, कंपनी भविष्यात या इंजिनवर आधारित आपली नवीन सिरीज-हायब्रीड प्रणाली कारमध्ये सादर करण्याची योजना आखत आहे, तथापि, हे नंतरच्या टप्प्यात सादर केले जाईल.