
भारतामध्ये वाहन चालवण्यासाठी वैध ड्रायव्हिंग लायसन्स असणं अत्यावश्यक आहे. १८ वर्ष पूर्ण झाल्यावर कोणतीही व्यक्ती RTO ऑफिसमध्ये जाऊन लायसन्ससाठी अर्ज करू शकते. मात्र लायसन्स काढताना किंवा ते नंतर नूतनीकरण (Renew) करताना काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात. यापैकी एक महत्त्वाचा नियम म्हणजे वयानुसार मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट सादर करणे.
जर तुम्ही पहिल्यांदाच ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करत असाल आणि तुमचं वय ४० वर्ष किंवा त्याहून जास्त असेल, तर मेडिकल सर्टिफिकेट (फॉर्म 1A) देणं बंधनकारक आहे. हे प्रमाणपत्र एखाद्या नोंदणीकृत डॉक्टरकडून घ्यावं लागतं. यात तुमचं वाहन चालवण्यासाठी शारीरिक व मानसिक स्वास्थ्य योग्य आहे की नाही, हे तपासलं जातं. ४० वर्षांवरील अर्जदाराने सर्टिफिकेट न दिल्यास अर्ज अपूर्ण मानला जाऊ शकतो.
ड्रायव्हिंग लायसन्स काही वर्षांनंतर नूतनीकरण करावं लागतं. जर रिन्यूअल करताना तुमचं वय ५० वर्ष किंवा त्याहून अधिक असेल, तर मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट देणं बंधनकारक ठरतं. वाढत्या वयामुळे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार करून हा नियम करण्यात आला आहे. त्यामुळे वय ५० पार केल्यावर लायसन्स रिन्यू करताना डॉक्टरच्या प्रमाणपत्राची आवश्यकता आहे.
जर नवीन लायसन्ससाठी अर्ज करताना तुमचं वय ४० वर्षांपेक्षा कमी असेल किंवा लायसन्स रिन्यू करताना ५० वर्षांपेक्षा कमी असेल, तर स्वतंत्र मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं नसतं. अशावेळी फक्त फॉर्म १ मधून सेल्फ-डिक्लरेशन करायचं असतं. यात स्वतःच्या आरोग्याबाबत प्रामाणिक माहिती द्यावी लागते.
वाहन चालवताना चालकाची दृष्टी, शरीरसामर्थ्य आणि मानसिक स्थिती योग्य असणं फार महत्त्वाचं आहे. वाढत्या वयात आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात, त्यामुळेच सरकारने वयानुसार मेडिकल तपासणी अनिवार्य केली आहे. यामुळे रस्त्यावरील अपघातांचं प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असं प्रशासनाने म्हटले.