दर महिन्याला पगार येतो, पण पैसे पुरत नाहीत? 80-20 चा हा नियम ठरू शकतो फायदेशीर

Money Saving Tips : दर महिन्याला पगार खात्यात जमा झाला की, यावेळी पैसे व्यवस्थित वाचवायचे असा विचार अनेक जण करतात. मात्र याचे योग्य नियोजन करण्यासाठी 80-20 हा नियम वापरला तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.

दर महिन्याला पगार येतो, पण पैसे पुरत नाहीत? 80-20 चा हा नियम ठरू शकतो फायदेशीर
Money 80-20 Rule
Image Credit source: Google
| Updated on: Aug 23, 2026 | 8:00 PM

भारतात नोकरदार वर्गाची संख्या लाखोंमध्ये आहे. दर महिन्याला पगार खात्यात जमा झाला की, यावेळी पैसे व्यवस्थित वाचवायचे असा विचार अनेक जण करतात. मात्र महिना जसजसा पुढे जातो, तसतसे खर्च वाढत जातात आणि शेवटी पुन्हा खिशात पैसे शिल्लक राहत नाहीत. तुमच्यासोबतही असे होत असेल, तर याचा अर्थ तुमचे उत्पन्न कमी आहेच असे नाही. कदाचित तुमचे पैसे योग्य ठिकाणी खर्च होत नसतील. अशावेळी 80-20 चा नियम तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो. हा कोणताही सरकारी योजना किंवा गुंतवणूक पर्याय नसून, पैशांचे योग्य व्यवस्थापन करण्याची एक सोपी पद्धत आहे. याची माहिती जाणून घेऊयात.

80-20 नियम म्हणजे काय?

हा नियम समजून घेणे अगदी सोपे आहे. याचा अर्थ प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नाचे काटेकोरपणे 80 टक्के आणि 20 टक्के असेच विभाजन करावे, असा नाही. या नियमाचा मुख्य उद्देश तुमच्या पैशांचा सर्वात मोठा हिस्सा नेमका कुठे खर्च होतो हे ओळखणे हा आहे. अनेकदा घरभाडे, EMI, मुलांची फी, किराणा आणि प्रवास यांसारखे काही मोठे खर्चच उत्पन्नाचा मोठा भाग खर्च करून टाकतात. हे मोठे खर्च योग्य पद्धतीने नियंत्रित केले, तर बचत करणे सोपे होऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास 80 टक्के खर्च करणे आणि कमीत कमी 20 टक्के रक्कमेची बचत करणे.

मोठे खर्च ओळखा

सर्वप्रथम महिन्यातील तुमचे सर्व खर्च लिहून काढा. त्यात अगदी छोट्या खर्चापासून मोठ्या खर्चापर्यंत प्रत्येक गोष्टीचा समावेश करा. त्यानंतर सर्वाधिक पैसे कुठे खर्च होत आहेत, हे तपासा. बाहेरचे जेवण, ऑनलाइन शॉपिंग, वारंवार कॅबचा वापर किंवा गरज नसताना वस्तू खरेदी करणे यामुळे तुमचे बजेट बिघडत असेल. असे अनावश्यक खर्च कमी केल्यास दर महिन्याला चांगली रक्कम वाचवता येऊ शकते.

उत्पन्न आणि गुंतवणुकीतही उपयोगी

80-20 नियम केवळ खर्च कमी करण्यासाठीच नाही, तर उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या नियोजनासाठीही वापरता येतो. तुमच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा नोकरी किंवा व्यवसायातून येत असेल, तर सर्वप्रथम उत्पन्नाचा मुख्य स्रोत अधिक मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरू शकते. गुंतवणुकीच्या बाबतीतही कोणतीही माहिती न घेता अनेक ठिकाणी पैसे गुंतवण्यापेक्षा काही चांगले पर्याय समजून घेणे अधिक योग्य ठरते. तुमच्यावर अनेक कर्जे असतील, तर ज्या कर्जावर सर्वाधिक व्याज आकारले जाते, ते आधी फेडण्यावर भर द्या. त्यामुळे भविष्यातील व्याजाचा खर्च कमी होऊ शकतो.

दर महिन्याला खर्चाचा आढावा घ्या

हा नियम लागू करण्यासाठी मोठे बदल करण्याची गरज नाही. महिन्यातून एकदा तुमचे बँक स्टेटमेंट आणि खर्चाचा आढावा घ्या. सर्वाधिक पैसे कुठे जात आहेत आणि त्यापैकी कोणता खर्च कमी करता येईल, हे तपासा. यासोबतच पगार जमा होताच काही रक्कम बचतीसाठी वेगळी ठेवण्याची सवय लावा. अनेक आर्थिक सल्लागार उत्पन्नातील सुमारे 20 टक्के रक्कम बचत करण्याचा सल्ला देतात. सध्या एवढी बचत करणे शक्य नसेल, तर कमी रकमेपासून सुरुवात करा आणि हळूहळू बचतीचे प्रमाण वाढवा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us