
अब्जाधीश उद्योजक मार्क क्यूबन यांनी जगभरातील उधळपट्टी करणाऱ्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. क्यूबन यांनी क्रेडिट कार्डच्या मायाजालाविषयी लोकांना सजग केले आहे. जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. क्रेडिट कार्ड खिशात असल्यावर अनेकांना खरेदीसाठी शंभर हत्तीचं बळ येतं. मागचा पुढचा विचार न करता धडाधड लोक खरेदी करतात. मग महिना अखेरीस क्रेडीट कार्डचं बिल चुकता करताना ते मेटाकुटीला येतात. त्यातही हप्ते पाडून द्या म्हणून गयावया करतात आणि कर्जाच्या विळख्यात रुततात. क्यूबन यांच्या मते, क्रेडिट कार्ड ही सुविधा नाही तर तुमच्या संपत्ती निर्माण करण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा आहे. क्रेडिट कार्डचे पैसे फेडत राहण्यापेक्षा ते कार्डच न घेणे अथवा बंद करणे हाच श्रीमंत होण्याचा सोपा मार्ग असल्याचे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले होते. त्याला आता बराच कालावधी उलटला असला तरी हा सल्ला आजही अनेकांना लागू होतोच की!
हे प्लास्टिक तुमच्या समृद्धीचा शत्रू
क्यूबन यांनी अत्यंत सामान्य परिस्थितीतून अब्जाधीशापर्यंतचा प्रवास केला. तो सोपा नव्हता तर खडतर होता. त्यातून आलेले अनुभव आणि निरीक्षणं ते सतत मांडतात. त्यांनी एका कार्यक्रमात क्रेडीट कार्डचे फायदे नाही तर तोटे स्वीकारा असा सल्ला दिला. क्रेडिट कार्डच्या माया जालात अडकू नका असा सल्ला त्यांनी दिला. लोक मला विचारतात की गुंतवणुकीचा चांगला पर्याय कोणता? मी म्हणतो की, “क्रेडिट कार्ड असेल तर ते अगोदर जाळा अथवा बंद करा. हेच आर्थिक समृद्धीचे पहिले पाऊल आहे.”
तुम्ही क्रेडिट कार्डवर 15 ते 20 टक्के व्याज भरता. नाही फेडले तर चक्रव्याढ व्याज आणि दंड भरता. म्हणजे एकाच रक्कमेवर तुम्हाला कितीतरी वेळा लुटल्या जाते इतकं साधं गणित तुम्हाला कळत नसेल तर मग तुम्ही श्रीमंत कसं व्हाल? प्रगती कशी साधाल? असा रोकडा सवाल क्यूबन करतात.
कर्ज फेडत बसणार का?
तुम्ही घर, कार, इतर अनेक वस्तू कर्जावर घेता. पण त्याप्रमाणात गुंतवणूक करत नाहीत. पैसा वाढवत नाहीत. पैशाची वृद्धी तुम्ही कर्ज फेडण्याकडे वळवली आहे. त्यात क्रेडीट कार्डचा वारेमाप वापर तर तुम्हाला कर्जाच्या विळख्यातून बाहेरच पडू देत नाही. क्रेडीट कार्ड नसेल तर गरजेच्या नसलेल्या वस्तू खरेदी करण्याची हावच येणार नाही. क्रेडीट कार्ड ती सोय देत असलं तरी तुमच्याकडून वर्षाला किती रुपये उकळतंय ते ही लक्षात घ्या असा सल्ला क्युबन यांनी दिला.
क्यूबन यांचा श्रीमंतीचा प्रवास खडतर होता. ते काही सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले बाळ नव्हते. छोटी छोटी कामं करत त्यांनी आयुष्य घडवलं. त्यांनी जीवनाच्या विविध टप्प्यावर जो अनुभव घेतला, निरीक्षणं नोंदवली. त्यावरून त्यांनी जेन झेड तरुणाईला बचतीचा आणि गुंतवणुकीचा,आर्थिक शिस्तीचा सल्ला दिला. एआयचा वापर करायला शिका, त्यात पारंगत व्हा असा सल्ला त्यांनी दिला.