
जगभरातील बाजारात ट्रम्प टॅरिफची भीती आहे. त्याचवेळी जगभरातील सर्वात मोठी क्रिप्टोकरेंसी बिटकॉइनने नवीन विक्रम केला आहे. एक बिटकॉइन १.१२ लाख डॉलरवर (जवळपास ९३ लाख रुपये) पोहचला आहे. बिटकॉइनचा हा उच्चांक आहे. बिटकॉइनवर जगभरातील गुंतवणूकदार विश्वास व्यक्त करत असल्याचेही त्यातून दिसून येत आहे.
मोठ्या कंपन्या आणि कॉर्पोरेट खजिनदारांकडून बिटकॉइनची जोरदार खरेदी झाली आहे. आपल्या पोर्टफोलियोत अनेक जण बिटकॉइनचा समावेश करत आहे. Strategy Inc (NASDAQ: MSTR) आणि GameStop Corp (NYSE: GME) यासारख्या कंपनींच्या संचालक मंडळानेही बिटकॉइन खरेदीस मंजुरी दिली आहे. यामुळे बिटकॉइनवरील विश्वास वाढला आहे. बिटकॉइन सोन्यासारखे सुरक्षित गुंतवणूक म्हणून प्रचलित होऊ लागला आहे.
जगभरातील शेअर बाजारात अस्थिरतेचे वातावरण आहे. रशिया-युक्रेन युद्ध, इस्त्रायल इराण संघर्ष, ट्रम्प टॅरिफ यामुळे शेअर बाजारातील वातावरण अनिश्चितेचे आहे. या सर्व परिस्थितीत गुंतवणूकदारांचा विश्वास बिटकॉइनवर वाढला आहे. अमेरिकेत बिटकॉइनसंदर्भात लवकरच नवीन कायदा तयार करण्यात येणार आहे. काही जणांच्या मते अमेरिकन सरकारकडूनही बिटकॉइनची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे क्रिप्टो मार्केटमध्ये अधिक वैधता आणि स्थिरता मिळणार आहे.
बिटकॉइन आता फक्त एक डिजिटल करेन्सी राहिली नाही तर गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीचा पर्याय झाला आहे. मोठे गुंतवणूकदार बिटकॉइनकडे वळत आहे. अनेक देशांच्या सरकारकडून यासंदर्भात कायदा केला जात आहे. भविष्यात यासंदर्भात नियम आणि कायदे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिटाकॉइनची किंमत वाढत आहे.
२०२५ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत बिटकॉइनचा दरात १८ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. प्रोफेशनल कॅपिटल मॅनेजमेंटचे सीईओ एंथनी पोम्प्लियानो यांनी गुंतवणूकदारांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, बिटकॉइन एकमात्र गुंतवणूक आहे, ज्यामध्ये जोखीम कमी आहे आणि त्याचे दर वाढत आहे. त्याचे दर जसे वाढत जातील त्याची जोखीम कमी होत राहणार आहे.