Nitin Gadkari : इराण युद्धामुळे गडकरी यांच्या कुटुंबाला बिझनेसमध्ये मोठं नुकसान, धंदा बसला पण ते म्हणाले की..

Nitin Gadkari : नितीन गडकरी हे राजकारणी असण्यासोबतच उद्योजकही आहेत. त्यांच्या कुटुंबाचा मोठा बिझनेस आहे. 'मी साखरेपासून डिटर्जेंट बनवतो. माझी सून हे सर्व काम पाहते' मुलाचाही आंतरराष्ट्रीय बिझनेस आहे. पण या व्यवसायात युद्धामुळे किती नुकसान झालय, त्याची माहिती गडकरी यांनी दिली.

Nitin Gadkari : इराण युद्धामुळे गडकरी यांच्या कुटुंबाला बिझनेसमध्ये मोठं नुकसान, धंदा बसला पण ते म्हणाले की..
Nitin Gadkari
Image Credit source: PTI
| Updated on: May 18, 2026 | 2:00 PM

मध्य पूर्वेत अमेरिका-इराणमध्ये निर्माण झालेल्या तणावाचा भारतावर मोठा आर्थिक परिणाम होतच आहे. या युद्धावर तोडगा दृष्टीपथात येत नसल्याने महागाई वाढत चालली आहे. या युद्धजन्य परिस्थितीचा भारतीय व्यापारावर परिणाम होत आहे. स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कुटुंबाला मध्य पूर्वेतील या संकटामुळे व्यापारात मोठं नुकसान झालं आहे. नितीन गडकरी हे राजकारणी असण्यासोबतच उद्योजकही आहेत. त्यांच्या कुटुंबाचा मोठा बिझनेस आहे. इराण-अमेरिका युद्धामुळे नितीन गडकरी यांच्या कुटुंबाच्या बिझनेसशी संबंधित शेकडो कमर्शियल कंटेनर रस्त्यातच अडकून राहिले. त्यामुळे त्यांना कोट्यवधी रुपयाचं नुकसान सहन करावं लागलं. स्वत: नितीन गडकरी यांनी हा खुलासा केला आहे.

नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्या कुटुंबाला बिझनेसमध्ये येणार्‍या अडचणींबद्दल सांगितलं. “मी साखरेपासून डिटर्जेंट बनवतो. माझी सून हे सर्व काम पाहते. आमच्या डिटर्जेंटचे जवळपास 100 कंटनेर दर महिन्याला अमेरिकेला जातात. पण तिथे जसं युद्ध सुरु झालं, या कंटनेरचा ट्रान्सपोर्ट बंद झाला. पूर्ण धंदा बसला” असं गडकरी म्हणाले. “या संकटामुळ मी हार मानली नाही. मी लोकल मार्केटमध्ये माल पुरवायला सुरुवात केली. खूप संघर्ष करावा लागला” असं गडकरी म्हणाले.

नितीन गडकरी यांच्या मुलाचा कुठला व्यवसाय?

डिटर्जेंटच्या बिझनेससह नितीन गडकरी यांच्या मुलाच्या आंतरराष्ट्रीय व्यवसायाला सुद्धा या मध्य पूर्वेच्या युद्धाचा मोठा फटका बसला आहे. नितीन गडकरी यांच्या मुलाचा इराणसोबत मोठा व्यापार आहे. या व्यापारातंर्गत भारतातून मोठ्या प्रमाणात केळी इराणला निर्यात व्हायची. तिथून सफरचंद भारतात यायची. अमेरिका-इराण युद्धाला सुरुवात झाल्यापासून हा सगळा पुरवठा ठप्प झाला आहे. युद्धामुळे केळ्यांनी भरलेले 400 कंटनेर रस्त्यात अडकून पडले. त्यातील सर्व माल खराब झाला. इराणहून 200 कंटेनर भरुन येणारी सर्व सफरचंद सुद्धा खराब झाली. गडकरी यांनी विमा कंपन्यांबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुद्धा विमा कंपनीवाले इंश्योरेंसचे पैसा द्यायला चाल-ढकल करत आहेत असं ते म्हणाले.

बिझनेसमध्ये अशा प्रकारचे चढ-उतार येत असतात

कौटुंबिक बिझनेसमध्ये कोट्यवधीच नुकसान झाल्यानंतरही नितीन गडकरी यांनी उद्योजकांचा उत्साह, हिम्मत वाढवली. आव्हानं प्रत्येक बिझनेसचा एक आवश्यक भाग असतो. बिझनेसमध्ये अशा प्रकारचे चढ-उतार येत असतात. म्हणून घाबरुन जाण्याऐवजी सकारात्मक विचार आणि आत्मनिर्भर होऊन पुढे गेलं पाहिजे असं ते म्हणाले.

Follow Us