Budget 2024 | मोदी यांचा चार जातींवर फोकस, या चार जातींमुळे मोदींना मिळणार तिसरी टर्म
FM Nirmala Sitharaman Speech on Budget 2024 | भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शक पद्धतीने काम सुरु आहे. त्यावेळी मोदी सरकारने पुन्हा तिसरी टर्म मिळवण्यासाठी चार जातींवर फोकस केला आहे. या चार जाती म्हणजे...

नवी दिल्ली, दि.1 फेब्रुवारी 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोदी- २ सरकारची दुसरी टर्म पूर्ण केली आहे. मोदी- २ सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्र्यांनी सुमारे तासभर भाषण केले. त्यात बोलताना त्यांनी चार जातींचा उल्लेख केला. त्या जाती म्हणजे शेतकरी, युवक, महिला आणि गरीब होय. निर्मला सीतारमण यांनी सांगितले की, गरीब, महिला, युवक आणि शेतकऱ्यांवर आमच्या सरकारने लक्ष केंद्रीत केले आहे. या लोकांचे जीवन चांगले बनवण्यासाठी आमच्या सरकारचा प्रयत्न सुरु आहे. गरीबाच्या कल्याणातूनच देशाचे कल्याण होणार आहे.
काय म्हणाल्या निर्मला सीतारमण
अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारमण म्हणाल्या की, सर्वांना घरे, प्रत्येक घरात पाणी, घराघरात स्वयंपाकासाठी गॅस, गरीबांना धान्य आणि शेतकऱ्यांसाठी शेतीमालीच्या आधारभूत किंमतीत वाढ, यामुळे देशातील गावागावांमधील परिस्थिती सुधारली आहे. 2047 मध्ये विकसित भारत बनवण्यासाठी सामाजिक न्यायावर भर देणे गरजेचे आहे. सामाजिक न्याय खरी धर्मनिरपेक्षता आहे. या ठिकाणी “भाई भतीजावाद” वाद नाही. सर्वांना समान संधी आहे. गरीब, युवक, महिला आणि शेतकरी या चार जाती आहेत. त्यांचे जीवन बदलले म्हणजे देशाचा विकास होईल.
सरकारकडून विरोधकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न
जात जनगणनेच्या मुद्द्यावरून काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष केंद्र सरकारला कोंडीत पकडत होते. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. जातीपातीचे राजकारण करून देश रसातळाला ढकलण्याचे काम केले आहे. आता ही विचारसरणी बदलली पाहिजे. विकास भारत संकल्प यात्रेच्या एका कार्यक्रमात त्यांनी महिला, तरुण, शेतकरी आणि गरीब या चार जातींचे वर्णन केले होते.
चार जातींचा फार्मूला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार जातींचा फार्मूला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात मांडला. त्या म्हणाल्या, पीएम जनधन योजनेच्या माध्यमातून आदिवसी समाजापर्यंत पोहचयाचे आहे. पायाभूत सुविधांच्या विकासात वेग आला आहे. सरकारी योजना आता जनेतपर्यंत जात आहेत. सरकार गरीबी निर्मूलन करण्यासाठी काम करत आहे.
