
निवृत्तीसाठी नॅशनल पेन्शन योजनेचा (एनपीएस) लाभ घेणाऱ्यांना नवीन सरकारी योजनेत जाण्याची संधी सरकारने दिली आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या नवीन युनिफाइड पेन्शन योजनेचा (यूपीएस) लाभ घेण्यासाठी आता ही शेवटची संधी आहे. एनपीएस सब्सक्रायबर्सने काही अटी पूर्ण केल्यास त्यांना यूपीएसचा लाभ घेता येणार आहे, असे नॅशनल पेन्शन सिस्टम ट्रस्टने म्हटले आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतनाप्रमाणे ठराविक निवृत्तीवेतन मिळण्यासाठी सरकारने नॅशनल पेन्शन योजनेत काही बदल केले. त्यानंतर नवीन यूपीएस योजना आणली. ही योजना 1 एप्रिल 2025 पासून लागू करण्यात आली आहे.
एनपीएस ट्रस्टने एक परिपत्रक काढले आहे. त्या माध्यमातून एनपीएस योजनेतील व्यक्ती यूपीएसचा फायदा कसा मिळवू शकतो, त्याची माहिती दिली आहे. यूपीएस यापूर्वी निवृत्त झालेल्या लोकांसाठीसुद्धा आहे. तो व्यक्ती एनपीएसचा सब्सक्रायबर असताना 31 मार्च 2025 पूर्वी निवृत्त झाला असेल आणि त्यांना केंद्र सरकारची नोकरी दहा वर्ष केली असेल तर त्याला या योजनेचा फायदा मिळणार आहे.
एनपीएस सब्सक्रायबर्स यूपीएस बेनेफिट्सचा लाभ कसा घेऊ शकतो, त्याची माहिती परिपत्रकातील सातव्या अनुसूचीत दिली आहे. त्यानुसार, योजनेचा लाभ घेण्यासाठी एनपीएस सब्सक्रायबर्स (फॉर्म-बी2) किंवा त्याच्या जीवनसाथीला (फॉर्म-बी4 या बी6) फॉर्म भरावा लागणार आहे. हा अर्ज संबंधित अधिकाऱ्यास द्यावा लागणार आहे. हा अर्ज www.npscra.net.nsdl.co.in/ups.php वर जाऊन ऑनलाइनसुद्धा सबमिट करु शकतात. ही प्रक्रिया 30 जून पूर्वी करावी लागणार आहे.
केंद्र सरकारच्या नवीन यूपीएस योजनेत एखाद्या कर्मचाऱ्याने कमीत कमी १० वर्ष सेवा पूर्ण केली असेल, तर त्याला निवृत्तीनंतर किमान दहा हजार रुपये महिन्यास पेन्शन मिळणार आहे. तसेच त्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या पेन्शनपैकी ६०% रक्कम त्याच्या कुटुंबाला मिळणार आहे. यूपीएसमध्ये किती पेन्शन मिळेल हे त्या कर्मचाऱ्याच्या सेवेच्या वर्ष आणि त्याचा पगार यावर अवलंबून असणार आहे.