
Cheapest Liquor State : भारतातील प्रत्येक राज्यात दारूच्या किंमतीत फरक आहे. एखाद्या राज्यात एक बिअरची बॉटल 120 रुपये तर इतर राज्यात हाच भाव 200 रुपयांपर्यंत जातो. उत्पादन शुल्कामुळे (excise duty) प्रत्येक राज्यात दारुच्या किंमतीत तफावत दिसते. दारुवर किती कर आकारायचा याचा निर्णय राज्य सरकार गेते. दारूला जीएसटी लागू नाही. परिणामी देशातील काही राज्यात दारु एकदम स्वस्त तर कुठे ती सर्वात महाग मिळते.
उत्पादन शुल्कामुळे किंमतीत तफावत
विविध राज्यातील उत्पादन शुल्क किंमतीतील तफावतीमुळे दारुच्या भावात तफावत दिसते. मद्य आणि मद्यार्क पदार्थांवर उत्पादन शुल्क आकारले जाते. प्रत्येक राज्य त्यांच्या हिशोबाने हा कर आकारते. काही राज्यात उत्पादन शुल्क अधिक प्रमाणात आकारले जाते. परिणामी तिथे दारू महाग मिळते. तर काही राज्यात उत्पादन शुल्क कमी आकारण्यात येत असल्याने तिथे दारु स्वस्त मिळते. पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी काही राज्यांनी मद्यावरील शुल्कात कपात केली आहे.
गोव्यात मिळते सर्वात स्वस्त दारू
देशात सर्वात स्वस्त दारू गोव्यात मिळते. येथे दारुवरील उत्पादन शुल्क अत्यंत कमी आहे. गोवा सरकारनुसार, स्वस्त दारूमुळे पर्यटनाला चालना मिळते. त्यामुळे या राज्यात बिअर आणि हार्ड लिकर दोन्हींचे दाम इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. गोव्यात दारुवर जवळपास 49 टक्के कर आकारण्यात येतो. तर इतर राज्यात हे कराचे प्रमाण 60 ते 70 टक्क्यांपर्यंत आहे.
हरियाणा आणि दिल्लीतही स्वस्तात मिळते दारू
हरियाणा राज्यात इतरांच्या तुलनेत कराचे प्रमाण कमी आहे. येथे एक्साईज ड्युटी जवळपास 47 टक्के आहे. येथे कँटीन स्टोर्स डिपार्टमेंट आऊटलेट्समुळे स्वस्तात दारु मिळते. हरियाणात खास करुन गुरुग्राम आणि फरीदाबाद सारख्या शहरात शेजारील राज्यांपेक्षा दारुचा भाव स्वस्त आहे. तर दिल्ली, सिक्कीम, दमन आणि दीव, पुद्दुचेरी या सारखी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशात दारु तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त आहे. दिल्लीत दारुवरील कर जवळपास 62 टक्के इतका आहे. तर उत्तर प्रदेशात हा दर 66 टक्के इतका जास्त आहे.
का कमी दारुचा भाव?
गोवा आणि पुद्दुचेरी या राज्या सरकारनुसार, दारुचे भाव कमी असल्याने पर्यटकांची संख्या अधिक आहे. स्वस्त भावामुळे दारु रिचवण्यासाठी आणि सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांचे पाऊल या राज्यांकडे पडते. त्यामुळे हॉटेल इंडस्ट्री आणि स्थानिक व्यावसायिकांना मोठा व्यावसायिक फायदा मिळतो. तर काही राज्यात दारु आणि दारुड्यांमुळे सामाजिक अप्रिय घटनांमध्ये वाढ होत असल्याने येथे भाव अधिक आहे. गोव्यात इतर राज्यात दारु नेण्यासही एक मर्यादा आहे. त्यापेक्षा अधिक दारु गोव्यातून आणली तर तो गुन्हा ठरतो.