
चीनच्या अनौपचारिक व्यापार निर्बंधांमुळे भारताच्या स्मार्टफोन निर्यातीला गंभीर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन (ICEA) ने सरकारला यासंदर्भात पत्र लिहिले आहे. त्यात म्हटले आहे की, चीन औपचारिक सूचना न देता जाणूनबुजून निर्बंध लादत आहे. चीनकडून हे निर्बंध कॅपिटल इक्विपमेंट, मिनरल्स आणि टेक्निकल पर्सनलवर आणले आहेत. त्यामुळे शिपमेंटमध्ये विलंब होत आहे आणि खर्च वाढत आहे. यामुळे भारताला सुमारे 32 अब्ज रुपयांचे नुकसान होऊ शकते. भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला धोका निर्माण होऊ शकतो.
आयसीईएने म्हटले आहे की, भारताची पुरवठा साखळी विस्कळीत करण्याची चीनची योजना आहे. भारताच्या ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब बनण्याचा प्रयत्नांना धक्का लावण्याचा चीनकडून प्रयत्न केला जात आहे. चीनच्या निर्बंधामुळे उत्पादनाची किंमत वाढत आहे. तसेच वेळेवर डिलेव्हरी देण्यात अडचणी येत आहेत. सरकारने यावर तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी आयसीईएने केली आहे. सध्या त्यात अॅपल, गूगल, मोटोरोला, फॉक्सकॉन, व्हिवो, ओप्पो, लाव्हा, डिक्सन, फ्लेक्स आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्ससारख्या कंपन्यांना फटका बसत आहे.
भारत इलेक्ट्रॉनिक्स मॅन्यूफॅक्चरिंगमध्ये जगातिक शक्ती म्हणून उद्यास येत आहे, त्यावेळी चीनकडून निर्बंध आणले जात आहेत. पाच वर्षांपूर्वी अॅपलचे सर्व फोन चीनमध्ये तयार होत होते. परंतु २०२० मध्ये सुरु झालेल्या प्रॉडक्शन लिंक्ड इंसेंटिव्ह योजनेत अॅपलने फॉक्सकॉन आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्ससोबत मिळून भारतात उत्पादन सुरु केले. आता जागतिक आयफोन उत्पादनापैकी २० टक्के उत्पादन भारतात होत आहे. अॅपल, गूगल, मोटोरोला आता भारतातून अमेरिकेत स्मार्टफोन निर्यात करत आहेत. सॅमसंगची भारतात उत्पादन क्षमता चांगली आहे. परंतु त्यांचे मुख्य निर्यात केंद्र व्हिएतनाम आहे.
सन २०२५ मध्ये भारतात ६४ अब्ज डॉलरचे स्मार्टफोन बनवण्यात आले. त्यातील २४.१ अब्ज डॉलरच्या फोनची निर्यात झाली आहे. स्मार्टफोन देशातील टॉप एक्सपोर्ट प्रॉडक्ट झाले आहे. परंतु चीनचे निर्बंध या प्रगतीसाठी अडथळा ठरणार आहे, असे आयसीईएने म्हटले आहे.