
Gold price Today, 18 October 2025 : धनत्रयोदशीपूर्वीच (Dhanteras 2025) 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख 30 हजारांपेक्षा अधिक झाली होती. खरेदीदारांना यंदा मौल्यवान धातुसाठी खिशाला झळ बसणार आहे. गेल्यावर्षी धनत्रयोदशीला सोन्याचा भाव 78,610 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका होता. आता सोन्यात 65.17 टक्क्यांची वृद्धी झाली आहे. यंदा वर्षाच्या पहिल्या 10 महिन्यातच सोन्यात 58 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.
किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. तरीही सराफा व्यापारी ग्राहक आज खरेदीला नक्की येतील अशी आशा बाळगून आहेत. जीएसटी दुरुस्ती, वेतन आयोगातील बदलाची नांदी, अनेकांना मिळालेले बोनस, महागाईत आलेली कमी यामुळे लोकांच्या खिशात पैसा खुळखुळत असल्याचा त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे धनत्रयोदशींचा मुहूर्त ग्राहक चुकवणार नाहीत असे सराफा व्यापाऱ्यांना वाटते.
सोन्याची किंमत काय?
goodreturns.in नुसार, 24 कॅरेट सोन्यात काल 333 रुपयांची वाढ झाली होती. तर आज सकाळी त्यात किरकोळ वाढ झाली. आता 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 31 हजार 001 रुपये इतका झाला. तर 22 कॅरेट सोने 305 रुपयांनी वधारले. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 20 हजार 100 रुपये असा आहे. काल किंमतीत कोणताही बदल झाला नसल्याचे दिसते.
चांदीत मोठी पडझड
चांदीने या वर्षी इतिहास रचला. एक किलो चांदीचा भाव 1 लाख 85 हजारांच्या घरात पोहचली आहे. गेल्या दोन दिवसात चांदीत 18 हजारांची घसरण आली. 16 ऑक्टोबर रोजी चांदीत 1 हजारांची तर 17 ऑक्टोबर रोजी चांदीत 4 हजारांची घसरण झाली होती. 18 ऑक्टोबर रोजी सकाळच्या सत्रात चांदीत 13 हजारांची महा घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 1,72,000 रुपये इतका आहे.
14 ते 24 कॅरेटचा भाव काय
आज इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) सोने घसरले आणि चांदी वधारले. 18 ऑक्टोबर रोजीच्या सकाळच्या सत्रात 24 कॅरेट सोने 1,29,580 रुपये, 23 कॅरेट 1,29,007, 22 कॅरेट सोने 1,18,700 रुपयांवर आहे. 18 कॅरेट आता 97,190 रुपये, 14 कॅरेट सोने 75,810 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. एक किलो चांदीचा भाव 1,71,275 रुपये इतका झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येते.
कुठे करणार स्वस्तात सोने खरेदी
सोन्याची किंमतीत त्याच्या मेकिंग चार्ज सुद्धा भाग असतो. त्यामुळे डिजिटल सोन्याची खरेदी करता येते. यामध्ये मेकिंग चार्ज नसतो. त्यामुळे हे सोने दागदागिने खरेदीपेक्षा स्वस्तात पडते. डिजिटल गोल्ड हे विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. Paytm, PhonePe, Google Pay वा Tanishq येथून ते खरेदी करता येईल. हे सोने तुम्हाला कधीही विक्री करता येते. विशेष म्हणजे हे सोने चोरी होण्याची भीती नसते. याशिवाय ते गोल्ड ETF मध्ये सुद्धा बदलता येते.