
EPFO Selfie Activates UAN Account: केंद्रीय भविष्य निर्वाह संघटनेने (EPFO) डिजिटल सेवांमध्ये आघाडी घेतली आहे. आता युएएन क्रमांक लक्षात ठेवण्याची वारंवार आवश्यकता नाही. आता फेस ऑथेंटिकेशन टेक्नोलॉजीवर (FAT ) आधारीत नवीन सुविधा सुरू केली आहे. त्यातंर्गत आता कर्मचाऱ्यांना केवळ एक सेल्फी घेतला आणि तो अपलोड केला तर कर्मचाऱ्यांचा युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN ) स्वतः जनरेट होईल आणि ते खाते सहज वापरू शकतील. याविषयीची माहिती ईपीएफओचे प्रादेशिक आयुक्त हेमंत कुमार यांनी दिली आहे. लवकरच ईपीएफओ सदस्यांना UPI, ATM अशा सुविधा सुद्धा मिळतील. त्यामुळे कर्मचाऱ्यांना झटपट सर्व सुविधा मिळतील.
काय काय मिळतील सुविधा?
आता UAN क्रमांकासाठी आणि तो तयार करण्यासाठी कर्मचाऱ्यांना कंपनीवर अवलंबून राहावे लागते. अनेकदा कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांचा युएएन तयार करण्यात विलंब होतो. चुकीची माहिती, स्पेलिंगमधील चूक आणि इतर काही कारणांमुळे कर्मचाऱ्यांना युएएनसाठी वाट पाहावी लागते. त्यामुळे ही अडचण आणि समस्या दूर करण्यासाठी ईपीएफओने कर्मचाऱ्यांना Self UAN Generation ही सुविधा सुरु केली आहे. यामुळे प्रक्रिया गतिमान, पारदर्शक आणि पूर्णपणे कर्मचाऱ्यांना अनुकूल होईल.
आपोआप सक्रिय होईल UAN
नवीन व्यवस्थेतंर्गत कर्मचारी आपल्या आधाराशी निगडीत फेस आयडीद्वारे UAN तयार करू शकतील. या संपूर्ण प्रक्रियेत कंपनीची कोणतीही भूमिका नसेल. कंपनीची गरज राहणार नाही. युएएन तयार होताच तो स्वत:हून सक्रीय होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पीएफ खात्याशी संबंधित सेवा लागलीच उपलब्ध होतील. आता यूएएन सुविधेसाठी कर्मचार्यांना वाट पाहावी लागणार नाही. त्यांचा यूएएन क्रमांक सक्रीय झाल्यानंतर आगामी युपीआय आणि एटीएम सुविधांचा लाभ ही त्यांना घेता येईल. कंपनीवर अवलंबून राहावे लागणार नाही. कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वाची सुविधा ईपीएफओने आता सुरु केली आहे.
एप्रिल महिन्यापासून युपीआय सुविधा
या वर्षी एप्रिल महिन्यापासून UPI च्या माध्यमातून सदस्य त्यांचा पीएफ काढू शकतील. BHIM ॲपवर EPFO सदस्यांनी ही रक्कम काढता येईल. कर्मचारी थेट त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतील. ही रक्कम झटपट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल. RBI च्या नियमानुसार आणि UPI व्यवहार मर्यादेनुसार ही रक्कम काढता येणार आहे. त्यानुसारच त्वरीत रक्कम काढण्यासाठी एक मर्यादा ठेवण्यात आली आहे. पाच लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढता येईल. संपूर्ण रक्कम काढता येणार नाही.