
FASTag Free Recharge Scheme : जर प्रवासासाठी महामार्गाचा वापर करत असाल तर टोल नाका ही तुमच्यासाठी डोकेदुखीच ठरते. पण NHAI तुमच्यासाठी खास योजना घेऊन आला आहे. यामध्ये 1000 रुपयांचे FASTag रिचार्ज अगदी मोफत मिळेल. पण त्यासाठी एक अगदी साधं काम करावं लागेल. एक फोटो काढून तुम्हाला तो NHAI ला पाठवावा लागेल. तो फोटो मिळाल्यावर तुम्हाला 1000 रुपयांचा FASTag रिचार्ज मोफत मिळेल.
भारतात स्वच्छ भारत मिशन सुरू आहे. या मोहीमेत NHAI ने अजून एक पाऊल पुढे टाकले आहे. त्याचा तुम्हाला मोठा फायदा होईल. Highway वर काही ठिकाणी पब्लिक टॉयलेटची व्यवस्था केलेली आहे. हे टॉयलेट घाणेरडे, अस्वच्छ असेल तर बिनधास्त त्याचा फोटो काढा आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या संकेतस्थळावर बिनधास्त अपलोड करा. केवळ इतके काम केले तर तुम्हाला 1,000 रुपयांचा फास्टॅग रिचार्ज अगदी मोफत देण्यात येईल.
असा अपलोड करा फोटो
राष्ट्रीय महामार्गावर प्रवासादरम्यान तुम्हाला टॉयलेट अस्वच्छ आणि घाणेरडे आढळल्यास सर्वात अगोदर त्याचा फोटो काढा. त्यानंतर राजमार्ग यात्रा या ॲपवर जा. त्याठिकाणी तुमचे नाव, जिथल्या टॉयलेटचा फोटो काढला ते ठिकाण, तुमच्या कारचा क्रमांक आण मोबाईल क्रमांक ही महत्त्वाची माहिती अपडेट करा. त्यानंतर टॉयलेटचा जिओ टॅग केलेला फोटो अपलोड करा.
तुमच्या बँक खात्यात येतील 1000 रुपये?
अस्वच्छ टॉयलेटचा फोटो अपलोड केल्यानंतर VRN वर (व्हेईकल रजिस्ट्रेशन नंबर) 1000 रुपयांचा फास्टॅग रिचार्ज पुरस्कार देण्यात येईल. हा पैसा तुमच्या वाहनाच्या रजिस्ट्रेशन क्रमांकाशी जोडलेल्या फास्टॅगमध्ये रिचार्जस्वरुपात टाकण्यात येतील. NHAI ही सुविधा देशभरातील सर्व राष्ट्रीय महामार्गावर 31 ऑक्टोबर 2025 रोजीपर्यंत लागू असेल.
या योजनेच्या अटी काय?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानुसार, ही ऑफर अस्वच्छ टॉयलेटसंबंधी छायाचित्रावर लागू असेल. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अख्त्यारित येणाऱ्या महामार्गावरील घाणेरड्या टॉयेलटच्या फोटोवरच योजना लागू आहे. जिओ टॅग्ड आणि टाईम स्टॅम्प्ड छायाचित्रांनाच पुरस्कार रक्कम देण्यात येईल. एआय अथवा इतर कोणत्याही प्रकारचा खोडसाळपणा केलेले छायाचित्र स्वीकार करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. उलट यामुळे गुन्हा दाखल होण्याची शक्यता अधिक आहे.