80 रुपये रोजंदारी ते 10 कोटींची कंपनी; बीड जिल्ह्यातील दादासाहेब भगत आहे तरी कोण? शार्क टँकपासून पंतप्रधान मोदींनी केले तोंडभरून कौतुक

Dadasaheb Bhagat DooGraphics : ‘सक्सेस के पीछे मत भागो, एक्सीलेंस का पीछा करो’, थ्री इडियट्समधील हा डायलॉग बीडमधील या तरुणाने खरा करुन दाखवला. रोजंदारीवर काम करणारा हा तरुण आज 10 कोटींच्या कंपनीचा मालक झाला आहे.

80 रुपये रोजंदारी ते 10 कोटींची कंपनी; बीड जिल्ह्यातील दादासाहेब भगत आहे तरी कोण? शार्क टँकपासून पंतप्रधान मोदींनी केले तोंडभरून कौतुक
दादासाहेब भगत
| Updated on: Oct 16, 2025 | 3:58 PM

Dadasaheb Bhagat Success Story : आपल्या देशात तरुणांच्या यशोगाथा कमी नाहीत. आपल्या आजुबाजूला सुद्धा अनेकांनी मेहनतीने, कष्टाने साम्राज्य कमावले आहे. बीड जिल्ह्यातील दादासाहेब भगत या तरुणाने असाचा यशाचा टप्पा गाठला आहे. 80 रुपयांवर रोजंदारी ते 10 कोटी रुपयांच्या कंपनीचा मालक ही त्याची उत्तुंग झेप अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. इयत्ता 10 वीपर्यंत शिकलेल्या या तरुणाने अनेकांना नोकरीचा आधार दिलाा आहे. शार्क टँकमधील जज सुद्धा त्याच्या कर्तृत्वाने भारावले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे कौतुक केले.

संघर्षावर हिंमतीने केली मात

घरची हालकीची परिस्थिती असल्याने लहान वयात दादासाहेब भगत याला विहीर खोदण्याच्या कामावर 80 रुपये रोजंदारीवर काम करावे लागले. 1994 साली जन्मलेल्या दादासाहेबानं मेहनत आणि जिद्द कधीच सोडली नाही. गाव सोडल्यावर पुण्यातील इन्फोसिसमध्ये ऑफिस बॉय म्हणून त्याने काम केले. नाईट शिफ्ट करावी लागत होती. दिवसा पुणे येथील इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीमधून मल्टिमीडियाचा डिप्लोमा त्याने पूर्ण केला. कोर्स संपल्यानंतर त्याने मुंबईत रोटो आर्टिस्टसोबत काम केले. नार्निया आणि स्टारवॉर सारख्या हॉलिवूड चित्रपटासाठी काम केले. त्यानंतर हैदराबाद येथे ॲनिमेशन टीव्ही मालिका निन्जा हतोरीसाठी काम केले.

पुढे 2016 मध्ये त्याचा अपघात झाला आणि येथूनच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तो अंथरुणाला खिळून होता. या दरम्यान फ्रीलान्सिंग कामाला त्याने सुरुवात केली. एक युनिक ॲनिमेशन डिझायन त्याने तयार केले. हे डिझाईन विकून 40 हजार रुपये कमावले आणि नोकरी सोडून याच कामावर लक्ष्य केंद्रीत केले.

गुरांच्या गोठ्यात उभारली कंपनी

दादासाहेबाने वर्ष 2016 मध्ये त्याचे पहिले स्टार्टअप नाईंथ मोशन (Ninth Motion) सुरु केले. हे स्टार्टअप ॲनिमेशन डिझाईन आणि डिजिटल आर्टसाठी काम करत होते. सुरुवातीला त्याने 10 ते 15 तरुणांच्या आधारे काम सुरु केले. यामाध्यमातून 2018-19 मध्ये लाखोंची उलाढाल केली. 2019 मध्ये कोरोनाची लाट आल्यावर दादासाहेबाला त्याचे पुण्याचे ऑफिस गुंडाळून बीडमध्ये कायमचे यावे लागले. मग त्याला कमाल आयडिया सुचली. त्याने गावातच गुरांच्या गोठ्यात त्याचे कार्यालय थाटले. त्याची टीम पण तिथेच बोलावली. महामारीच्या काळात त्याने डूग्राफिक (DooGraphics) हे स्टार्टअप पण सुरु केले. एआयच्या माध्यमातून ग्राफिक्स डिझाईनचे काम सुरु केले. कॅन्हवा प्रमाणेच ते काम करते. शार्क टँकच्या सीझन- 3 मध्ये तो सहभागी झाली. त्याची संघर्षगाथा पाहुन जज सुद्धा भारावले. जज अमन यांनी या स्टार्टअप्सचे 10 टक्के शेअर खरेदी केले. दादासाहेबाला पाठिंबा दिला.