सोने – चांदीत चढउतार सुरुच, चांदीची हाराकीरी तर सोन्याचा भाव वधारलेलाच !

चांदी आणि सोन्याच्या किंमतीत सतत चढ उतार सुरुच आहे.चांदीच्या दरात मोठी घसरण पहायला मिळाली आहे. चांदीची एकीकडे अशी हाराकिरी सुरु असतानाच सोन्याचे दर मात्र सलग दोन दिवस वधारलेलेच आहेत.

सोने - चांदीत चढउतार सुरुच, चांदीची हाराकीरी तर सोन्याचा भाव वधारलेलाच !
gold and silver rate news
| Updated on: Feb 10, 2026 | 11:09 PM

देशाच्या वायदा बाजारात सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळत असली तर दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात चांगली वाढ पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या किंमती ३ टक्क्यांहून जास्त घसरण पाहायला मिळाली आहे. चांदीची किंमत तब्बल २.६५ लाख रुपयांनी घसरली आहे. तज्ज्ञांच्या मते सोने आणि चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ- उतार पाहायला मिळत आहेत. सोने आणि चांदी दोन्ही नवीन मॅक्रो इकोनॉमिक इंडीकेटरच्या शोधात आहेत. जोपर्यंत दोन्ही मौल्यवान धातूंना कोणताही दुसरा ट्रीगर मिळत नाही, तोपर्यंत सोने आणि चांदीच्या किंमतींची अशीच स्थिती राहू शकते. चला तर पाहूयात दिवस अखेर सोने आणि चांदीचे दर किती होते.

सोने सलग दुसऱ्या दिवशी चढेच

चांदीची घसरण सुरु असतानाच सोन्याच्या दरामध्ये वाढ सुरूच आहे. ९९.९ टक्के शुद्ध सोने २,२०० रुपयांनी म्हणजेच १.४ टक्क्यांनी वाढून १,६०,७०० रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. मागील कामकाजाच्या सत्रात सोने १,५८,५०० रुपये प्रति १० ग्रॅम भावावर ​​बंद झाले होते. ही वाढ ज्वेलर्स आणि गुंतवणूकदारांनी सतत खरेदी केल्यामुळे झाल्याचे सोने व्यापाऱ्यांचे म्हटले आहे. अमेरिकन डॉलर मजबूत असूनही, सोन्याने आपली वाढ कायम ठेवली आहे.

चांदीची मोठी घसरण

चांदीचे दर प्रति किलोग्रॅम २.६४ लाख रुपयांपर्यंत घसरले आहेत. त्यामुळे  मंगळवारी चांदीची खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला, मात्र, चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या आकडेवारीनुसार,  राजधानी दिल्लीत चांदीचे दर ७,५०० रुपयांनी आणि जवळपास तीन टक्क्यांनी घसरून २.६४ लाख रुपयांवर आले आहेत.

सोमवारी चांदी २,७२,००० रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली होती.जी मंगळवारी आणखी घटून २,६४,५०० रुपये (सर्व करांसहित) राहिली आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते औद्योगिक मागणी मधील सुस्ती आणि जागतिक दबावाच्या कारणामुळे ही घसरण पाहायला मिळत आहे.

तज्ज्ञांचे म्हणणे काय ?

आज मंगळवारी सोन्याच्या किमतीत किंचित वाढ झाली.तर दुसरीकडे व्यापारी नव्या मॅक्रोइकॉनॉमिक संकेतांची वाट पाहात होते. नजीकच्या काळात बाजारात एक ‘कंसोलिडेशन फेज’ राहू शकतो. सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये श्रेणीबद्ध चढ-उतार होऊ शकतात.दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची स्पॉट किंमत १.३७ टक्क्यांनी घसरून ८२.१६ डॉलर प्रति औंस झाली, तर सोने ५,०५२.४३ डॉलर प्रति औंसवर किंचित कमी झाले.

बाजारातील सहभागी अमेरिकेतील प्रमुख किरकोळ विक्री आकड्यांची वाट पाहत आहेत, त्यानंतर आठवड्याच्या अखेरीस अमेरिकेतील बेरोजगारी आणि बिगर-शेती वेतन डेटा बाहेर येईल.ही आकडेवारी बाहेर आल्याने बाजारात अस्थिरता येण्याची शक्यता आहे, कारण ते फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरणे आणि व्याजदराची दिशा निश्चित होणार आहे. त्यानंतरच सोने आणि चांदीच्या किंमतीवर पुढील दिशेवर परिणाम होईल असे एलकेपी सिक्युरिटीजचे कमोडिटी अँड करन्सी रिसर्च  एनालिस्ट, उपाध्यक्ष, जतिन त्रिवेदी यांनी म्हटले आहे.

सावध ऐका पुढल्या हाका !

बुलियन बाजारातील हा चढ उतार पाहाता किंमती आता स्थिर नाहीत हे तर स्पष्ट आहे. एकीकडे घरगुती मागणी सोन्याला आधार देत आहे. तर जागतिक संकेतांचा चांदीवर मोठा दबाव पडला आहे. गुंतवणूकदारांना सल्ला दिला जात आहे की त्यांनी अमेरिकेतील आर्थिक आकड्यांवर नजर ठेवावी कारण येत्या काही दिवसात किंमतीत आणखी मोठा चढ-उतार पाहायला मिळू शकतो.