Cyclone Akwan : 11 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा, नद्या- नाले एक होणार, महाराष्ट्रात कुठे कुठे पाऊस?
बंगालच्या उपसागरात मोठं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 11 राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरात मोठं चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चक्रीवादळाला ‘अकवान'(Akwan) असं नाव देण्यात आलं आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी 20 नोव्हेंबर रोजी दुपारी आंध्र प्रदेशच्या नरसापूर आणि ओडिसाच्या पुरी समुद्र किनाऱ्यादरम्यान धडकणार आहे. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाकडून (IMD) हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ उत्तर -पश्चिम दिशेकडे वेगाने सरकत आहे. हे चक्रीवादळ शुक्रवारी 20 नोव्हेंबर रोजी दुपारी नरसापूर आणि पुरीच्यामध्ये किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे.
हे चक्रीवादळ धडकताच वाऱ्याचा वेग प्रचंड वाढणार आहे, या काळात ताशी 100 ते 110 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. या काळात समुद्रामध्ये प्रचंड उंच लाटा उसळणार आहेत. शुक्रवारी समुद्रात सरासरी 0.5 ते 1.0 मीटर उंचीच्या लाटा उसळणार असून, या पार्श्वभूमीवर मच्छिमारांसाठी देखील हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.
अतिमुसळधार पावसाचा इशारा
दरम्यान हवामान विभागाकडून चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 48 तासांमध्ये आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड आणि छत्तीसगड या पाच राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांसह पूर्वोत्तर राज्य असलेल्या आसाम, मेघालय, नागलँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपूरा या राज्यांमध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही पावसाची शक्यता
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणात काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील मेघगर्जनेसह आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात देखील काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. राज्यात अंशत: ढगाळ वातावरण राहणार आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला असून, ज्या -ज्या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, तेथील नागरिकांनी महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, अन्यथा घराबाहेर पडू नये, असं हवामान विभागाने म्हटलं आहे.
