
Gold And Silver Rate in Nepal: भारतासह जगभरात सोने आणि चांदीच्या किंमती भडकल्या आहेत. जागतिक बाजारातही दोन्ही धातूंचा कहर सुरू आहे. आता सोने सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिले नाही तर दुसरीकडे चांदी खरेदी करणे जवळपास दुरापास्त होत आहे. दोन्ही धातू दिवसागणिक नवनवीन उच्चांक गाठत आहेत. अशावेळी भारताचा शेजारी नेपाळमध्ये या दोन्ही मौल्यवान धातूच्या किंमती काय आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तुम्हाला माहिती आहे का नेपाळमध्ये 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव भारतापेक्षा स्वस्त आहे की जास्त आहे?
सोन्याचा भाव किती?(Gold Price in Nepal)
नेपाळमधील अधिकृत संस्था पात्रोच्या माहितीनुसार, नेपाळमध्ये 1 ग्रॅम सोन्याचा भाव 26,492 नेपाळी रुपया आहे. भारतीय चलनात हा भाव 16,714.54 रुपये इतका आहे. तर नेपाळमध्ये 10 ग्रॅम सोन्याचा भाव 2,64,920 नेपाळी रुपया इतका आहे. भारतीय चलनात हा भाव 1,67,145.38 रुपये इतका आहे. तर भारतात 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव यावेळी 1,54,310 रुपये इतका आहे. म्हणजे भारतापेक्षा नेपाळमध्ये सोन्याची किंमत अधिक आहे. नेपाळमध्ये सोने भारतापेक्षा महाग आहे.
चांदीचा भाव किती? (Silver Price in Nepal)
नेपाळमध्ये 10 ग्रॅम चांदीचा भाव 5,800 नेपाळी रुपये आहे. तर एक किलो चांदीचा भाव 5,80,000 नेपाळी रुपये इतका आहे. नेपाळचे चलन भारतीय रुपयाच्या तुलनेत कमकुवत आहे. यावेळी 1 रुपया 1.58 नेपाळी रुपयांच्या बरोबर आहे. 5,80,000 नेपाळी रुपयात एक किलो चांदी येते. तर भारतीय रुपयात हा भाव 3.65 लाख रुपये इतका आहे. नेपाळमधील 10 ग्रॅम चांदीचा भाव भारतीय रुपयात 3659 रुपया इतका आहे. भारतात यावेळी 1 किलो चांदीचा भाव 3,17,705 रुपये इतका आहे. भारताच्या तुलनेत चांदी सुद्धा नेपाळमध्ये महाग आहे.
भाव विक्रमीस्तरावर का?
भूराजकीय तणाव, अमेरिकेतील ट्रम्प सरकारची धोरणं आणि जगातील अनेक भागात सुरू असलेली अस्थिरता याचा परिणाम सोने आणि चांदीच्या किंमतीवर होत आहे. रशिया-युक्रेन युद्ध न थांबल्याने ट्रम्प हे सध्या त्याच्या राग भारतासह ब्रिक्स देशावर काढत असल्याने सोने आणि चांदीचा भाव गगनाला भिडला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या मानाने नेपाळ ही छोटी अर्थव्यवस्था आहे. या अर्थव्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम दिसत आहे. आशिया उपखंडातील सर्वच देशात सोने आणि चांदीच्या किंमती वधारल्या आहेत. या किंमती अजून भडकण्याची भीती व्यक्त होत आहे. तर काहींच्या मते बोर्ड ऑफ पीस आणि जगातील समीकरणं बदलल्यानंतर या किंमती धाडदिशी आपटतील.