
सन 2025 मध्ये शेअर बाजारात चढ उतार दिसून आला. त्याचवेळी सोने बाजाराने नवीन विक्रम केले आहे. सोने आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडत लाखाच्या उंबरठ्यावर पोहचले आहे. या वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांतच सोन्यातून सोन्यासारखा परतावा मिळाला आहे. चार महिन्यांत सोन्याच्या दरात 25 टक्के वाढ झाली आहे. देशात सोन्याचे दर लाखाच्या जवळपास पोहचले आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचे दराने 99 हजारांचा आकडा ओलांडला असून पुन्हा विक्रमी उच्चांकी गाठली आहे.
जळगावात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर जीएसटीसह 99 हजार 700 रूपयांवर पोहोचले आहे. जळगावात सोन्याच्या दराने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. जळगावच्या सराफ बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच सोन्याचे दर 99 हजार रुपयांवर गेले आहे. चांदीच्या दरात सुद्धा एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीच्या दराने पुन्हा एक लाख रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 500 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर एक लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. सोने खरेदी सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेली नाही, अशा ग्राहकांच्या प्रतिक्रिया आहेत.
मागील आठवड्यात मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजे एमसीएक्सवर सोने सर्वकालीन उच्चाकांवर पोहचले. 5 जून रोजी संपणाऱ्या कालावधीत सोन्याचे दर 95,935 रुपये प्रती 10 ग्रॅमवर गेले. एप्रिल महिन्यातच सोने आतापर्यंत 5000 रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहे. एमसीएक्सवर 1 एप्रिल रोजी सोने 10 ग्रॅमसाठी 90,875 रुपये होते. तसेच 2025 च्या सुरुवातीला सोन्याचे दर 78000 रुपयांवर होते. म्हणजे चार महिन्यांपेक्षा कमी कालावधीत सोन्यातून भरभरुन रिटर्न मिळाले आहे. 2026 मध्ये सोन्याचे दर हे एक लाखांवर पोहोचणार असल्याचा सराफ बाजारातील तज्ज्ञांचा होता. मात्र 2025 मध्ये सोन्याने एक लाखांचा विक्रमी टप्पा गाठला, असे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले.
देशातंर्गत बाजारात सोने नवीन विक्रमावर गेले आहे. मागील आठवड्यात सराफ बाजारात सोने 98000 हजारांवर होते. आता ते लाखाच्या जवळ आहे. यामुळे लवकरच सोने आता एका लाखाच्या किंमतीचा टप्पा ओलांडणार आहे. जागतिक परिस्थितीत अनिश्चितता असल्यामुळे सोन्याचे दर वाढत आहे. दोन देशांमधील संघर्षानंतर सोने गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम म्हटले जाते. सध्या ट्रम्प टॅरिफमुळे अमेरिका आणि चीन यांच्यात वॉर सुरु आहे. त्यामुळे शेअर बाजारात चढ उतार सुरु आहे. यामुळे सोन्याची किंमत वाढत आहे.