
9K gold : देशात सोन्याने लाखाचा टप्पा तर कधीच ओलांडला आहे. सोने सर्वसामान्य ग्राहकांच्या हाताबाहेर गेले आहे. त्यातच ग्राहकांसाठी स्वस्त आणि वजनाने हलक्या दागदागिन्यांचा एक पर्याय समोर आला आहे. जर महागड्या सोन्यामुळे दागिने खरेदी करता येत नसतील तर हा पर्याय तुमच्यासाठी आहे. केंद्र सरकारने आता 9 कॅरेट सोन्याच्या हॉलमार्किंगला मंजुरी दिली आहे. 9 कॅरेट सोन्याची दागिने बाजारात दाखल झाली आहेत. त्याची किंमत 22 आणि 24 कॅरेट सोन्याच्या तुलनेत अर्ध्याहून कमी आहेत. काय आहे हे 9K गोल्ड?
काय आहे 9 कॅरेट सोने?
9 कॅरेट दागिन्यात 37.5 टक्के शुद्ध सोने आणि इतर धातुंचा समावेश असतो. नुकतेच सरकारने 9K सोन्याच्या हॉलमार्किंगला मंजुरी दिली आहे. यापूर्वी केवळ 24K, 23K, 22K, 20K, 18K आणि 14K सोन्याचीच हॉलमार्किंग करण्यात येत होती.
का वाढली 9K सोन्याची मागणी?
24 कॅरेट सोन्याच्या किंमती आकाशाला भिडल्या आहेत. सोन्याचे आकर्षण मात्र कमी होत नाही. त्यामुळे ग्राहकांना हलक्या वजनाची आणि कमी किंमतीच्या सोन्याने भुरळ घातली आहे. जून महिन्यात सोन्याची विक्री 60 टक्क्यांनी घसरली. सध्या लग्न सोहळे आणि सणावार कमी झाले आहेत. अनेक कंपन्या कमी किंमतीच्या आणि वजनाने हलक्या दागिन्यांच्या विक्रीवर जोर देत आहेत.
सध्या 9 कॅरेट सोन्याची किंमत जवळपास 37000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोने सध्या जवळपास 97,828 रुपये प्रति 10 ग्रॅम इतके आहे. तर जीएसटीसह 9 कॅरेट सोन्याची किंमत 38,110 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या घरात पोहचते. 24 कॅरेट, 22 कॅरेट सोने जीएसटीसह अजून महाग मिळते.
ग्रामीण भागात मोठी मागणी
भारतात दरवर्षी जवळपास 800 ते 850 टन सोन्याची विक्री होते. त्यातील 60 टक्के मागणी ही ग्रामीण भागातून करण्यात येते. सध्याच्या सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्याने हलक्या वजनाचे आणि स्वस्तातील दागिन्यांची मागणी वाढली आहे. त्यातच सरकारने 9 कॅरेट सोन्याच्या हॉलमार्किंगचा मार्ग मोकळा केल्याने ग्रामीण भागात 9 कॅरेट सोन्याला सुगीचे दिवस आले आहेत.
या ब्रँडने सुरु केली विक्री
Titan कंपनीचा ब्रँड Mia by Tanishq ने आता 9 कॅरेट (9K) सोन्याची विक्री सुरु केली आहे. आता पर्यंत हा ब्रँड 14K आणि 18K सोन्याचे दागिने विक्री करत होता. कंपनीने Swiggy Instamart च्या माध्यमातून 9K गोल्ड विक्रीची योजना तयार केली आहे. त्यामुळे ग्राहकांना सहजरित्या दागदागिने मिळू शकतील.