
Gold-Silver Price Today: मंगळवारी, 4 नोव्हेंबर रोजी सकाळी सोने आणि चांदीच्या किंमतीत किंचित घसरण दिसली. डॉलर मजबूत झाल्याने, गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या धोरणामुळे दोन्ही धातू स्वस्त झाल्याचे समोर येत आहे.
आज सकाळी 10:20 वाजता वायदे बाजारात (MCX) डिसेंबर महिन्यातील वायद्यासाठी सोन्यात 0.68% घसरण आली. सोने 1,20,583 प्रति 10 ग्रॅमवर पोहचेल तर चांदीत 0.66% घसरण होऊन किंमती 1,46,783 प्रति किलोग्रॅमवर व्यापार करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्यात मोठी वाढ नोंदवली गेली. पण गुंतवणूकदारांच्या नफेखोरीमुळे (Profit Booking) भावात घसरण झाली. म्हणजे ज्या गुंतवणूकदारांनी अगोदर स्वस्तात सोने खरेदी केले. त्यांनी किंमती भडकताच सोन्याची विक्री केली. परिणामी बाजारात मोठ्या प्रमाणात सोने आले आणि भाव घसरले.
डॉलरच्या मजबुतीमुळे सोन्यावर दबाव
सोन्याच्या जागतिक किंमती नेहमी अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित होतात. जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा इतर चलनात सोने खरेदी करणे महागते. परिणामी मागणीतही घट होते. डॉलर इंडेक्स आज जवळपास 0.20% वाढून 100.05 वर पोहचला आहे. गेल्या तीन महिन्यातील ही उच्चांकी पातळी आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह लवकरच व्याजदरात कपात कमी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने डॉलरची आगेकूच सुरु असल्याचे मानले जाते. ऑक्टोबरमध्ये फेडने यंदा दुसऱ्यांदा व्याज दरात कपात केली आहे. त्याचा परिणाम सोने आणि चांदींच्या किंमतींवर दिसत आहे. आता तिसऱ्यांदा जर व्याजदर कपात झाली तर सोने आणि चांदीच्या किंमतीत घसरण येण्याची शक्यता आहे.
चांदीची काय चाल
गेल्या 15 दिवसांपासून चांदीत घसरण सुरु होती. पण आता चांदीत तेजी दिसून येत आहे. सोमवारनंतर मंगळवारी चांदीच्या किंमतीत घसरण दिसली. MCX वर आज चांदी 1,46,783 रुपये प्रति किलोवर व्यापार करत आहे. चांदीचा उपयोग केवळ दागदागिने तयार करण्यासाठीच नाही तर उद्योगविश्वातही मोठा आहे. विविध उद्योगांमध्ये चांदीचा वापर होतो. मोबाईल, संगणक, सौर ऊर्जा पॅनल, इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि ऑटोमोबाईल पार्ट्ससाठी चांदीचा मोठा वापर होतो. एका अंदाजानुसार जवळपास 60-70% चांदीचा वापर हा औद्योगिक कारणांसाठी होतो.
मुंबई-पुण्यात काय भाव?
दिल्लीमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,22,510 रुपये, मुंबईत हा भाव 1,22,460 रुपये, कोलकत्तामध्ये हा दर 1,22,460 रुपये, बंगळुरुमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,22,460 रुपये तर पुण्यातही हाच भाव आहे. बडोद्यामध्ये सोन्याची किंमत 1,22,510 रुपये तर अहमदाबादमध्ये पण तितकाच भाव आहे. स्थानिक कर आणि जीएसटी यानुसार या किंमतीत विविध शहरातील भावात फरक जाणवतो.