घरात किती कॅश आणि किती सोने ठेवणं योग्य? नियम मोडला तर कारवाई अटळ! जाणून घ्या सविस्तर

घरात किती रोकड ठेवता येते यासाठी नियम आहेत. त्यासंदर्भात योग्य कागदपत्रं देखील बाळगणं गरजेचं आहे. अन्यथा मोठ्या कर आणि दंडाची कारवाई होऊ शकते. त्यामुळे या नियमांची जाणीव ठेवूनच सुरक्षितपणे गुंतवणूक करा.

घरात किती कॅश आणि किती सोने ठेवणं योग्य? नियम मोडला तर कारवाई अटळ! जाणून घ्या सविस्तर
| Edited By: | Updated on: May 02, 2025 | 3:22 PM

आपल्याकडे नेहमी परंपरेने घरात काही प्रमाणात रोख रक्कम आणि सोने ठेवण्याची सवय आहे. मात्र गेल्या काही वर्षांत आयकर विभागाच्या धाडीत मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने जप्त झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनात प्रश्न निर्माण होतो – आपण घरात किती कॅश किंवा सोनं ठेवू शकतो? आणि त्यावर काय नियम आहेत?

घरात रोकड ठेवण्यावर नियम काय?

आयकर कायद्यानुसार घरात किती रोख रक्कम ठेवायची यावर थेट अशी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही हवे तेवढे पैसे घरात ठेऊ शकता. पण महत्त्वाचं म्हणजे त्या कॅशचा स्त्रोत वैध असला पाहिजे. म्हणजेच तो पैसा कुठून आला, हे तुम्हाला सांगता आणि सिद्ध करता आलं पाहिजे. जर तुम्ही तो पैसे उत्पन्न म्हणून दाखवले असतील आणि तुमच्या इनकम टॅक्स रिटर्नमध्ये नमूद केले असतील, तर कोणतीही अडचण येणार नाही.

कॅशचा स्त्रोत नाही सांगितला तर काय होते?

जर तपासणीदरम्यान तुम्ही ठेवलेली रोख रक्कम कुठून आली याचा ठोस पुरावा दाखवू शकलात नाही, तर त्या पैशाला बेहिशेबी मानले जाते. अशा बेहिशेबी रकमेवर आयकर विभागाकडून मोठा कर आणि दंड लावला जाऊ शकतो. काही प्रकरणांमध्ये एकूण ७८% पर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. म्हणजेच १ लाख रुपये जर बेहिशेबी सापडले, तर जवळपास ७८ हजार रुपये सरकारकडून वसूल केले जाऊ शकतात.

घरात सोने ठेवण्याच्या मर्यादा कोणत्या?

कॅशच्या तुलनेत घरात सोनं ठेवण्यासाठी नियम ठरवले गेले आहेत. CBDT (Central Board of Direct Taxes) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार विवाहित महिला ५०० ग्रॅमपर्यंत, अविवाहित महिला २५० ग्रॅमपर्यंत आणि पुरुष फक्त १०० ग्रॅमपर्यंत सोनं बिनधास्त ठेवू शकतात. या मर्यादेत कोणतीही अडचण येत नाही.

जर जास्त सोनं असेल तर काय?

जर घरात वरील मर्यादेपेक्षा जास्त सोनं असेल, तर ते कसं मिळवलं याचा ठोस पुरावा असणे गरजेचे आहे. सोनं खरेदीची पावती, वारसा हक्काचे कागदपत्र किंवा उत्पन्नाचा पुरावा असणे अनिवार्य आहे. जर पुरावा दिला गेला नाही, तर आयकर विभाग सोनं जप्त करू शकतो आणि संबंधित व्यक्तीविरुद्ध कारवाई होऊ शकते.