शेअरमधून झाला फायदा,किती द्यावा लागेल टॅक्स? काय सांगते गणित

Tax on Share Benefits: अनेकजण शेअर बाजारात रोज काही ट्रेडिंग करत नाहीत. फावल्या वेळात ते शेअर खरेदी करून ठेवतात. काही जण दोन, तीन अथवा पाच वर्षानंतर चांगला फायदा पाहुन या शेअरची विक्री करतात. त्यांना किती द्यावा लागतो टॅक्स, काय आहे ते गणित?

शेअरमधून झाला फायदा,किती द्यावा लागेल टॅक्स? काय सांगते गणित
किती द्यावा लागेल कर
| Updated on: Jan 09, 2026 | 3:45 PM

Tax on Stock Benefits: यावेळी केंद्रीय अर्थसंकल्प रविवारी 1 फेब्रुवारी 2026 रोजी येणार आहे. अशावेळी केंद्र सरकार सर्वसामान्यांसाठी अनेक बदल करण्याची शक्यता आहे. यामध्ये कॅपिटल गेन टॅक्सविषयी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की कॅपिटल गेनशी संबंधित नियम काय आहेत आणि जर कोणी 5 वर्षांपासून शेअर खरेदी करून ठेवला असेल तर त्याला किती कर द्यावा लागेल?

जर एखाद्या गुंतवणूकदाराने इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली असेल आणि एक वर्षाहून अधिक काळ ती गुंतवणूक सुरक्षित असेल. त्यानंतर तो विक्री करत असेल तर त्याला जो फायदा होईल तो लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) अंतर्गत कर द्यावा लागेल. आयकर नियमानुसार, इक्विटी शेअर आणि इक्विटी म्युच्युअल फंड प्रकरणात 12 महिन्यांहून अधिक काळ होल्डिंग असेल तर ती दीर्घकाळ गुंतवणूक ग्राह्य धरुन त्यावर जो नफा होतो त्यावर कर द्यावा लागेल.

किती लागेल कर?

समजा एखाद्या गुंतवणूकदाराने पाच वर्षांपूर्वी 2 लाख रुपयांचे शेअर खरेदी केले होते. आता हे शेअर 5.5 लाखात विक्री केले. अशा परिस्थितीत एकूण नफा 3.5 लाख रुपये होईल. हा नफा लाँग टर्म कॅपिटल गेन मानल्या जाईल. यामध्ये 1.25 लाख रुपयांची रक्कम कर मुक्त असेल तर उर्वरीत 2.25 लाख रुपयांच्या रक्कमेवर 12.5 टक्क्यांचा कर द्यावा लागेल. हा कर 28,125 रुपये इतका असेल. त्यावर 4 टक्क्यांचा सेस जोडल्यानंतर एकूण जवळपास 29,250 रुपयांचा कर द्यावा लागेल. जर या रक्कमेवर अतिरिक्त कर लागू होणार असेल तर ही रक्कम अजून काही प्रमाणात वाढेल.

गुंतवणूकदार काय करु शकतात?

गुंतवणूकदारांनी ही समजून घ्यावे की कॅपिटल गेन टॅक्स हा केवळ नफ्यावर लावण्यात येतो. पूर्ण विक्री किंमतीवर कर आकारल्या जात नाही. याशिवाय 1.25 लाख रुपयांची सवलत ही दरवर्षी मिळते. त्यामुळे शेअर आणि म्युच्युअल फंडमध्ये दीर्घकाळापर्यंत गुंतवणूक करणे हे परताव्यासाठी जितकं फायदेशीर मानल्या जाते, तितकचं करांच्या दृष्टीने हा सौदा फायदेशीर मानल्या जातो.