Mutual Fund मध्ये पैसाच पैसा, पण पहिल्यांदा SIP करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या…

तुम्हाला एसआयपी करायची असेल तर अगोदर काही बाबी समजून घेणे गरजेचे आहे. कारण चुकीचा फंड निवडला तर भविष्यात मोठे नुकसान होऊ शकते.

Mutual Fund मध्ये पैसाच पैसा, पण पहिल्यांदा SIP करताना काय काळजी घ्यावी? जाणून घ्या...
sip and mutual fund
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 07, 2025 | 6:43 PM

Mutual Fund And SIP : म्युच्यूअल फंडात केलेली गुंतवणूक तुलनेने कमी जोखमीची मानली जाते. म्युच्यूअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा देऊ शकते. कारण म्युच्यूअल फंडातील गुंतवणुकीत चक्रवाढ व्याजाने परतावा मिळतो. आता म्युच्यूअल फंडात पैसे गुंतवणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. विशेष म्हणजे तरुण आता अगदी कॉलेज जीवनापासूनच एसआयपी करत आहेत. एसआयपीत दीर्घकाळ केलेली गुंतवणूक तुम्हाला खूप चांगले पैसे मिळवून देऊ शकते. पण तुम्ही नव्यानेच एसआयपी करत असाल तर काही बाबींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अन्यथा तुम्हाला मोठा फटका बसू शकतो. एसआयपी करताना फंड कसा निवडावा हे समजून घेणे गरजेचे आहे.

एसआयपी कशी सुरु करावी?

एसआयपी सुरू करायची असेल तर तुम्हाला अगोदर फंड निवडावा लागतो. याबाबत फायनॅन्शियल एक्स्पर्ट हर्षवर्धन रुंगटा यांनी सविस्तर माहिती दिली आहे. त्यांच्या मतानुसार पहिल्यांदाच एसआयपी करणाऱ्यांनी काही खास बाबी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण पहिलाच अनुभव वाईट राहिला तर आत्मविश्वास कमी होऊ शकतो. त्यामुळे संबंधित व्यक्ती गुंतवणुकीपासून दूर जाऊ शकते. एसआयपी करताना एकूण तीन बाबींकडे लक्ष दिले पाहिजे.

कोणत्या तीन बाबींकडे लक्ष देणे गरजेचे आहे?

हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार तुम्ही पहिल्यांदाच एसआयपी करत असाल तर अगोदर टाईम होरायझनकडे लक्ष द्यावे म्हणजेच तुम्ही गुंतवणूक किती काळासाठी करणार आहात? हे ठरवणे गरजेचे आहे. त्यानंतर रिस्क अॅपेटाईट म्हणजेच तुम्ही गुंतवणूक करताना किती जोखमी उचलू शकता, हेही महत्त्वाचे आहे. तिसरा मुद्दा म्हणजे तुमचे आर्थिक धेय्य काय आहे. म्हणजेच तुम्हाला किती परतावा हवा आहे, याचा ठोकताळा बांधणए गरजेचे आहे.

कोणत्या फंडात गुंतवणूक करावी?

हर्षवर्धन यांच्या माहितीप्रमाणे तुम्ही एसआयपी कोणत्या उद्देशासाठी करत आहात, हेही तेवढेच महत्त्वाचे आहे. शिक्षण, लग्न, घर खरेदी आदी वेगवेगळ्या उद्देशांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने एसआयपी करता येऊ शकते. तुम्ही अल्पकालीन गुंतवणूक करणार असाल तर तुम्ही डेट फंडात गुंतवणूक करू शकता. मीडियम टर्म गुंतवणुकीसाठी हायब्रिड फंड आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी इक्विटी फंड उत्तम आहेत

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)