
भारताची सर्वच पातळीवर प्रगती व्हावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापार, देशांतर्गत होणार व्यापार यांत व्हाढ होण्यासाठी तसेच लघु व सूक्ष्म उद्योगांची भरभराट व्हावी यासाठी सरकारकडून अनेक महत्त्वाची धोरणं आखण्यात आली आहेत. भारताला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. याच समुद्रकिनारी असणारी लोकवस्ती तसेच समुद्रामुळे निर्माण झालेल्या व्यापारांचा विस्तार व्हावा यासाठीदेखील भारताने धोरण आखले आहे. यामुळे आता या समुद्रकिनाऱ्याच्या मदतीने भारताला प्रगतीच्या नव्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. याबाबत विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी एका लेखात सविस्तर माहिती दिली आहे.
भारत विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न पाहतोय. मात्र या स्वप्नाचा मार्ग ब्लू ईकोनॉमीतून जातो, असे जितेंद्र सिंह यांनी म्हटले आहे. सिंह यांच्यानुसार भारताला तब्बल 11 हजार किलोमीटर समुद्रकिनारा लाभला आहे. यातील 2.5 दशलक्ष वर्ग किलोमीटरचा परिसर हा एक्सक्लुझिव्ह इकोनॉमीक झोन आहे. त्यामुळे आपल्याला या क्षेत्रात विकास करण्याची खूप संधी आहे. तज्ज्ञांच्या मते समुद्र आणि समुद्रकिनाऱ्याशी निगडित असलेले मत्स्यपालन, बंदरे, माल वाहतूक, मरिन बायोटेक्नॉलॉजीक, अपारंपरिक ऊर्जा, खोल समुद्रातील शोध इत्यादी क्षेत्रांच्या मदतीने भारत समृद्धीच्या आणि आत्मनिर्भरतेच्या नव्या शिखरावर पोहोचेल, असे जितेंद्र सिंह यांचे मत आहे.
समुद्रकिनाऱ्यावरील अर्थकारण वाढावे यासाठी सरकारने काम चालू केले आहे. सरकारच्या सागरमाला प्रकल्पाअंतर्गत बंदरांचे आधुनिकिकीरण केले जातेय. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून मत्स्य पालन केंद्रात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. हरित सागर मोहिमेअंतर्गत सरकार बंदरांमुळे प्रदूषण कसे होणार नाही, याकडे विशेष लक्ष देत आहे. तसेच कार्बनच्या उत्सर्जनात घट व्हावी यासाठीही सरकारचे प्रयत्न चालू आहेत. मिशन ओशन अंतर्गत सरकार खोल समुद्रात संशोधन करण्यासाठी 6000 पाणबुड्या तयार करत आहे.
डॉ. जितेंद्र सिंह यांच्यानुसार ब्लू इकोनॉमीमध्ये फक्त संसाधनांचा वापर करून घेतला जातो, असे नाही. ब्लू इकोनॉमीमुळे समाजही सशक्त होतो. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. तरुणांना मरिन इंजिनिअरिंग, डेटा अॅनॅलेटिक्स यासारखी क्षेत्रे खुली होत आहेत. वेगवेगळे स्टार्टअप्स स्मार्ट फिशिंग, ग्रीन पोर्ट लॉजिस्टिक्स तसेच मरिन बायोटेक्नॉलॉजी क्षेत्रात वेगवगळे प्रयोग करत आहेत. यामुळे उद्योगांचीही एका प्रकारे भरभराट होत आहे.