पदवीधरांसाठी बँकेत काम करण्याची संधी! इंडियन बँकेत 1500 अप्रेंटिस पदांसाठी भरती सुरू, 25 नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज!
इंडियन बँकेत अप्रेंटिसच्या 1500 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदवीधर उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्याची संधी असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 नोव्हेंबर आहे. याबाबतची अधिक माहिती येथे जाणून घ्या.

बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या पदवीधरांसाठी महत्त्वाची संधी उपलब्ध झाली आहे. इंडियन बँकेने आर्थिक वर्ष 2026-27 साठी देशभरात 1500 अप्रेंटिस पदांच्या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रातही 70 पदे उपलब्ध आहेत. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, विद्यावेतन आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया.
एकूण पदे आणि महाराष्ट्रातील जागा किती?
इंडियन बँकेकडून देशभरात एकूण 1500 अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. ही भरती अप्रेंटिसशिप कायदा 1961 अंतर्गत असून देशातील 30 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पदे उपलब्ध आहेत. यामध्ये उत्तर प्रदेशात सर्वाधिक 285, तामिळनाडूमध्ये 270, पश्चिम बंगालमध्ये 145, आंध्र प्रदेशात 85, बिहारमध्ये 80, महाराष्ट्रात 70, मध्य प्रदेशात 65 आणि झारखंडमध्ये 60 पदे आहेत.
शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा काय?
या भरतीसाठी उमेदवाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे. ही पदवी 1 एप्रिल 2022 ते 1 नोव्हेंबर 2026 या कालावधीत पूर्ण केलेली असावी आणि निकाल 1 नोव्हेंबर 2026 किंवा त्यापूर्वी जाहीर झालेला असणे गरजेचे आहे. तसेच, 1 नोव्हेंबर 2026 रोजी उमेदवाराचे वय 20 ते 28 वर्षांच्या दरम्यान असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत मिळेल.
किती मिळणार विद्यावेतन?
निवड झालेल्या उमेदवारांना 12 महिन्यांचे ऑन-द-जॉब प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कालावधीत मेट्रो आणि शहरी भागातील शाखांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा 15 हजार रुपये, तर ग्रामीण आणि निमशहरी भागातील शाखांमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्यांना दरमहा 12 हजार 300 रुपये विद्यावेतन मिळेल.
अर्ज करण्याची अंतिम तारीख
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 5 नोव्हेंबर 2026 पासून सुरू झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 25 नोव्हेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येईल. अर्ज आणि शुल्क भरण्याची अंतिम तारीखही 25 नोव्हेंबर आहे.
अर्ज कसा कराल?
या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी सर्वप्रथम NATS 2.0 पोर्टलवर जाऊन आपली प्रोफाइल पूर्ण करावी आणि एनरोलमेंट आयडी मिळवावा. त्यानंतर इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइटला indianbank.bank.in भेट द्यावी. वेबसाइटवरील ‘करिअर’ विभागात जाऊन ‘Engagement of Apprentices in Indian Bank 2026’ या लिंकवर क्लिक करून नोंदणी करावी. अर्जामध्ये वैयक्तिक, शैक्षणिक तसेच राज्य आणि जिल्ह्याबाबतची माहिती भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. त्यानंतर ऑनलाइन अर्ज शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा आणि भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवावी.