LIC किंवा इतर पॉलिसी धारकांना मिळणार जास्त पैसा, IRDAI ने बदलला हा नियम
नवीन नियमानुसार, सरेंडर व्हॅल्यूची मोजणी होणार आहे. तुम्ही जर चार वर्ष प्रिमियम भरला आहे आणि पॉलिसी सरेंडर करणार असाल तर पूर्वी चार लाखाला २.४ लाख रक्कम मिळत होती. आता ही रक्कम ३.१ लाख मिळणार आहे.

भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) आणि इतर कंपन्यांकडून अनेक जण विमा काढून घेत असतात. परंतु अनेक वेळा विम्याचे हप्ते वेळेवर भरले जात नाही. त्यामुळे त्याची पॉलिसी बंद पडते. अनेक जण पॉलिसीचा पूर्ण काळ होण्यापूर्वीची सरेंडर करतात. परंतु सरेंडरनंतर खूप कमी पैसे मिळतात. आता आयआरडीएआय (भारतीय विमा नियामक प्राधिकरण) ने सरेंडर व्हॅल्यूच्या नियमांमध्ये चांगला बदल केला आहे. त्यानुसार पॉलिसीधारकांना आधीच्या तुलनेत 20-30 टक्के जास्त रक्कम मिळणार आहे.
सरेंडर व्हॅल्यू काय असते?
जेव्हा एखादी व्यक्ती आपली जीवन विमा पॉलिसी मुदत पूर्ण होण्यापूर्वी बंद करतो, तेव्हा विमा कंपनी त्याला परत करत असलेल्या रक्कमेला सरेंडर व्हॅल्यू म्हणतात. ही रक्कम तुम्ही किती वर्षे प्रीमियम भरला आहे आणि तुम्ही कोणत्या प्रकारची पॉलिसी घेतली आहे, यावर अवलंबून असते.
आयआरडीएआयकडून सरेंडर व्हॅल्यूच्या नियमात बदल केला आहे. आता सर्व एंडोमेंट पॉलिसीवर स्पेशल सरेंडर व्हॅल्यू लागू होणार आहे. म्हणजेच ग्राहकांना पॉलिसी सरेंडरसाठी पूर्वीपेक्षा जास्त रक्कम मिळणार आहे. पूर्वी दोन वर्षांचे प्रिमियम भरल्यानंतर सरेंडर व्हॅल्यू मिळत होती. परंतु आता एका वर्षाच्या प्रिमियमनंतरही सरेंडर व्हॅल्यू मिळणार आहे.
किती पैसा मिळणार?
नवीन नियमानुसार, सरेंडर व्हॅल्यूची मोजणी होणार आहे. तुम्ही जर चार वर्ष प्रिमियम भरला आहे आणि पॉलिसी सरेंडर करणार असाल तर पूर्वी चार लाखाला २.४ लाख रक्कम मिळत होती. आता ही रक्कम ३.१ लाख मिळणार आहे. तसेच पूर्व वर्षभर प्रिमियम भरल्यानंतर काहीच मिळत नव्हते. आता एका लाखाला ६२ हजार परत मिळणार आहे.
आयआरडीएआयने सरेंडर व्हॅल्यू मोजण्यासाठी एक नवीन फॉर्म्युला ठरवला आहे. आता १० वर्षांच्या सरकारी बाँडचा व्याजदर आधार म्हणून घेतला जाईल. विमा कंपन्या त्यात जास्तीत जास्त ०.५० टक्के भर घालू शकतात. ही नवीन पद्धत सिंगल प्रीमियम आणि ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या पॉलिसींना देखील लागू असेल.
