5 लाखांचे झटपट कर्ज, 30 दिवसांचे व्याज माफ, छोट्या व्यापारांसाठी सरकारचे खास क्रेडिट कार्ड, तुमच्याकडे आहे का?

Modi Government MSME Credit Cards: केंद्र सरकारने छोट्या व्यापारांना बळ देण्यासाठी खास क्रेडिट कार्ड योजना आणली आहे. प्रामाणिक आणि मेहनती व्यावसायिकांना यामुळे फायदा होईल. त्यांच्या उद्योगांना चालना मिळेल. काय आहे हे क्रेडिट कार्ड?

5 लाखांचे झटपट कर्ज, 30 दिवसांचे व्याज माफ, छोट्या व्यापारांसाठी सरकारचे खास क्रेडिट कार्ड, तुमच्याकडे आहे का?
Modi Government MSME Credit Cards
| Updated on: Apr 14, 2026 | 3:32 PM

Modi Government MSME Credit Cards: केंद्र सरकारने छोट्या व्यावसायिकांसाठी (MSMEs) एक खास क्रेडिट कार्ड आणण्याची योजना आखली आहे. या महिन्यातच हे क्रेडिट कार्ड लाँच होईल. मध्यम आणि लघु उद्योजकांसाठी ही क्रेडिट कार्ड फायद्याचं ठरेल . कमी व्याजदर असलेल्या या क्रेडिट कार्डमुळे उद्योजकांना पाच लाख रुपयांपर्यंतची मदत मिळेल. छोट्या व्यावसायिकांना NBFC अथवा सावकाराकडून कर्ज घ्यावे लागणार नाही. त्यांचे आर्थिक शोषण होणार नाही. फायनान्शिएल एक्सप्रेसने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यानुसार, उद्यम पोर्टलवर नोंदणीकृत उद्योजकांना 5 लाखांपर्यंत असुरक्षित क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल.

सूत्रांच्या माहितीनुसार, पारंपारिक क्रेडिट कार्डपेक्षा हे कार्ड उजवे ठरेल. कर्ज जर थकले तर खासगी कंपन्या वार्षिक 36-42% वार्षिक व्याज आकारतात. त्यामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडते. तर नवीन क्रेडिट कार्डवर वार्षिक 18% पर्यंत म्हणजे जवळपास खासगी पतसंस्थांपेक्षा अर्धे व्याजदर आकारले जाईल. हे क्रेडिट कार्ड याच महिन्यात लाँच होणार असल्याची माहिती याविषयी संबंधित एका अधिकाऱ्याने दिली.

सरकारची योजना काय?

या खास क्रेडिट कार्डमध्ये 30 दिवसांपर्यंत कर्जावर व्याज आकारण्यात येणार नाही

क्रेडिट कार्डची रक्कम सुविधेनुसार जमा करता येईल. उधारीवर 18 टक्क्यांपर्यंत व्याजदर

पहिल्याच टप्प्यात सरकार 10 लाख कार्ड बाजारात आणणार

डीफॉल्टची जोखीम कमी करण्यासाठी खास सुविधा आणि सवलती देण्यात येतील

व्याजदर आकारण्याचा कालावधी अधिक, पेमेंट करण्यासाठी मोठा अवधी

रक्कम थकल्यास ती टप्प्याटप्प्याने देण्याची सवलत देण्याची शक्यता

मासिक हप्ते सुद्धा मोठे नसतील. त्यामुळे व्यावसायिकांवर मोठा बोजा पडणार नाही

क्रेडिट कार्ड योजना कशासाठी?

ही योजना छोट्या व्यापार्‍यांसाठी नगदी रक्कमेची चिंता दूर करण्यासाठी आणण्यात येत आहे. एखाद्या व्यावसायिकाला, लघु आणि मध्यम व्यावसायिकाला जर एखाद्या कारणामुळे खेळते भांडवल आवश्यक असल्यास त्याच्यासाठी हे क्रेडिट कार्ड वरदान ठरेल. साधारण क्रेडिट कार्डची पेमेंट सायकल ही कमी असते. त्यामुळे परतफेडीचे मोटे टेन्शन असते. तर उशीर झाल्यास त्याला चक्रवाढ व्याजाने रक्कम मोजावी लागते. आर्थित तडजोड करता करता व्यावसायिक तोट्यात जातो आणि क्रेडिट कार्डवरील व्याजाची रक्कम वाढत राहते.

Follow Us