
वर्ष 1903 मध्ये मुंबईत अरब महासागराच्या किनाऱ्यावर जमशेदजी टाटा यांनी ताज हॉटेल बांधले. हे देशातील पहिले फाईव्ह स्टार हॉटेल होते. ते केवळ दगड अथवा सिमेंटनें बांधले नव्हते तर त्यामागे टाटांची (Tata hotel history) जिद्द, उत्कटता आणि सूडाची आग होती. 1889 मध्ये जमशेदजी टाटा यांनी अचानक ताज हॉटेल बांधण्याचे जाहीर केले होते. मी असे हॉटेल बांधले, जे या शहराने कधीच पाहिले नाही, असे त्यांनी त्यावेळी जाहीर केले होते. त्याची एकच चर्चा झाली. 14 वर्षांनी 1903 मध्ये हॉटेल बांधल्या गेले.
घरातूनच झाला विरोध
जमशेदजी टाटा यांच्या दाव्याने एकच खळबळ उडाली. हॉटेल बांधण्याचे त्यांचे हे वेड आहे, असा सूर घरातूनच निघाला. त्यांच्या बहिणींनी या हॉटेल उपक्रमाला विरोध केला. हरीश भट यांनी त्यांचे पुस्तक ‘टाटा स्टोरीज’ मध्ये त्याची हकीकत मांडली. “तुम्ही बंगळुरुत सायन्स इन्स्टिट्यूट बांधत आहात. पोलाद कारखाना सुरू करत आहात. आता म्हणताय की तुम्ही भटारखाना, हॉटेल काढत आहात?” अशी टीका बहिणींनी केली होती.
काय होते ते कारण?
जमशेदजी टाटा यांच्या मनात हॉटेल बांधण्याचा निर्णय काही सहजा सहजी आला नव्हता. एका अपमानामुळे त्यांना हा निर्णय घेतला. युरोपियन, खास करुन ब्रिटिशांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. त्याकाळी मुंबईत काळा घोडा परिसरात वाटसन्स हे हॉटेल होते. ते लोकप्रिय होते. तिथे केवळ युरोपियन लोकांनाच प्रवेश मिळत होता. एक दिन जमशेदजी टाटा तिथे पोहचले. पण त्यांना दरवाजावरच दरबानने रोखले. ते भारतीय असल्याने त्यांना रोकण्यात आले. ही बाब टाटांच्या मनाला काट्यासारखी रुतली. मग त्यांनी सर्वात मोठे आणि आलिशान हॉटेल बांधण्याचा चंग बांधला.
हॉटेल उभारण्यासाठी मोठी मेहनत
त्या काळी त्यांनी सॅटरडे रिव्ह्यू या नावाच्या तत्कालीन मासिकात एक लेख छापला. त्यांनी मुंबईला शोभणारे दिमाखदार हॉटेल मुंबईत असावे असे मत ठामपणे मांडले. हॉटेलसाठी त्यांनी मग लंडनच्या हॉटेलची पहाणी केली. बर्लिन येथून सामान आणले. पॅरिसमधून बॉलरूम आणि खांब मागवले. लिफ्ट मागवली. अमेरिकेतून पंखे मागवले. रूम थंड करण्यासाठी (India first hotel with AC) कार्बन डायऑक्साईडचे बर्फ तयार करणारे यंत्र बसवले. या रुमचे प्रत्येक भाडे 6 रुपये होते. ताज हॉटेल तयार करण्यासाठी त्यावेळी जवळजवळ 26 लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता. पहिल्या दिवशी या हॉटेलमध्ये केवळ 17 जण आले होते. अनेक जणांनी टाटांनी पांढरा हत्ती आणला अशी टीका केली. पण काही दिवसांनीच फाईव्ह स्टार हॉटेल देशाची ओळख झाली.