
New Labour Codes 2025: सरकारच्या नवीन कोड ऑन सोशल सिक्युरिटी (CSS) 2020 ने कोट्यवधी कुटुंबांना मोठा दिलासा दिला आहे. हा कोड लागू झाल्यानंतर कुटुंबाची व्याख्या विस्तृत झाली आहे. आता केवळ पत्नी, मुलं, आई-वडिल यांच्यापुरते कर्मचाऱ्यांचे कुटुंब मर्यादित नाही. आता त्याचा विस्तार करण्यात आला आहे. आजी-आजोबाच नाही तर सासू-सासऱ्यांना सुद्धा EPF, ESI, ग्रॅज्युएटी आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे या नवीन कायद्याने छोट्या कुटुंबाची, न्युक्लिअर कुटुंबाची व्याख्याच मोडीत काढली आहे. कुटुंबातील अनेक सदस्यांना या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे.
पूर्वी केवळ पत्नी, मुलगी-मुलगा,आई-वडिल आणि अविवाहित मुलींना लाभ मिळत होता. न्यायालयांनी यापूर्वी सुद्धा मायक्रो, न्युक्लिअर कुटुंबाची व्याख्या उचलून धरली होती. तर EPF, ESI, ग्रॅज्युएटी आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ जवळच्या इतर नातेवाईकांना देण्यास नकार दिला. यामुळे ज्या कर्मचाऱ्यांवर सासू-सासरे आणि इतरांचा भार आहे. त्यांची मोठी पंचाईत होत होती. आता नवीन नियमांमुळे ही परिस्थिती बदलेल. नवीन कोडमध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे गरजूंना आर्थिक आणि स्वास्थ्य लाभ मिळतील.
आता या सदस्यांचा समावेश
नवीन नियमातंर्गत आईकडील आजी-आजोबांना, लग्न न झालेल्या आणि अल्पवयीन भाऊ-बहिणींना तर महिला कर्मचाऱ्यांचे सासू-सासरे यांना सुद्धा कुटुंबाच्या व्याख्येत स्थान देण्यात आले आहे. जर एखादी महिला कर्मचाऱ्यावर सासू-सासऱ्याची जबाबदारी असेल तर त्या यासाठी अर्ज करू शकतील. यापूर्वी कायद्यात ही तरतूद नव्हती. EPF, ESI, ग्रॅज्युएटी आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा या सदस्यांना आता लाभ मिळेल. हा नवीन बदल भारतीय कुटुंब व्यवस्था ही मायक्रो नसून मोठ्या कुटुंबाची संकल्पना असल्याचे या कायद्याने अधोरेखित केले आहे.
या योजनांचा मिळेल लाभ
EPF, ESI, ग्रॅज्युएटी आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांमध्ये कामाच्या ठिकाणी दुर्घटनेत अपंगत्व आल्यास अथवा मृत्यू झाल्यास सरकार या नातेवाईकांना आता नुकसान भरपाईची रक्कम देऊ शकेल. अर्थात कुटुंबातील इतर सदस्यांना ग्रुप हेल्थ इन्शुरन्स, मेडिक्लेम वा इतर चांगल्या योजनांचा लाभ घेता येणार नाही. या सदस्यांना या योजनांचा लाभ द्यायचा की नाही हे कंपनी ठरवेल.
जे कर्मचाऱ्यावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून आहेत. त्यांनाच या योजनेसाठी जोडण्यात येईल. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं द्यावी लागतील. जर कर्मचाऱ्याने दुसरे लग्न केले अथवा कुटुंबातील आर्थिक परिस्थिती बदलली तर त्यानुसार या योजनांच्या लाभावरही बंधन येऊ शकतात. जर घटस्फोट घेतला तर या योजनेचा लाभ संबंधित सासू-सासऱ्यांना मिळणार नाही.