News9 Global Summit 2025 : स्वप्नांना कोणतंच लिंग नसतं..; ‘न्यूज 9 ग्लोबल समिट’मध्ये महिलांचा बुलंद आवाज

जर्मनीत सध्या 'न्यूज 9 ग्लोबल समिट' सुरू असून त्यात भारत आणि जर्मनीतील आघाडीच्या महिलांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा केली. नेतृत्वात समानता आवश्यक असून महिला पुढे जातात तेव्हा संपूर्ण समाजाची प्रगती होते, असं त्या म्हणाल्या.

News9 Global Summit 2025 : स्वप्नांना कोणतंच लिंग नसतं..; न्यूज 9 ग्लोबल समिटमध्ये महिलांचा बुलंद आवाज
News9 Global Summit 2025
Image Credit source: Tv9
| Updated on: Oct 10, 2025 | 11:34 AM

जर्मनीत गुरुवारी News9 Global Summit 2025 च्या दुसऱ्या एडिशनची सुरुवात झाली. या परिषदेत Strength to Strength: Women in Leadership (नेतृत्वातील महिला) या विषयावर चर्चा झाली. भारत आणि जर्मनीतील चार प्रभावशाली महिलांनी त्यावर आपले विचार मांडले. यात कॅप्टन जोया अग्रवाल (ज्येष्ठ कमांडर, एअर इंडिया), डॉ, सरिता ऐलावत (सह-संस्थापक, Bot Lab Dynamics), व्हेनेसा बाखोफर (व्यवस्थापकीय संचालक, Mark & Schneider GmbH) आणि एव्हलिन डी ग्रुइटर (व्यवस्थापकीय संचालक, जर्मन महिला उद्योजक संघटना) यांचा समावेश होता.

काय म्हणाल्या डॉ. सरिता ऐलावत?

“फक्त बोर्डरुममध्ये महिलांची उपस्थिती पुरेशी नाही. तर त्यांना समान संधी आणि निर्णय घेण्याची शक्ती देणं महत्त्वाचं आहे. माझं स्टार्टअप ‘बॉट लॅब डायनॅमिक्स’ आयआयटी दिल्लीशी संलग्न आहे. जगातील महत्त्वाच्या आणि आघाडीच्या ड्रोन कंपन्यांपैकी ती एक आहे. आपण एकाच वेळी हजारो ड्रोन्स उडवू शकतो. परंतु 250 इंजीनिअर्सच्या टीममध्ये महिलांची संख्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. महिलांचा सहभाग 50-50 टक्के असल्याशिवाय खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व शक्य होणार नाही”, असं मत डॉ. सरिता ऐलावत यांनी मांडलं.

व्हेनेसा बाखोफर यांचं मत

“माझ्या क्षेत्रात 75 टक्के महिला काम करतात, परंतु त्यापैकी निम्म्या ‘हाफ-डे’ कामगार आहेत. सध्या जवळपास 40 हजार नोकऱ्या रिक्त आहेत आणि पुढील दशकात ही संख्या एक लाखापर्यंत पोहोचू शकते. हे साध्य करण्यासाठी महिलांनी पूर्णवेळ काम करणं आवश्यक आहे”, असं मत व्हेनेसा यांनी मांडलं. यावेळी त्यांनी कामाचं लवचिक मॉडेल, विश्वासार्ह डे-केअर आणि नेतृत्व भूमिकांमध्ये अधिक महिलांची गरज या गोष्टींवर भर दिला.

“खरा बदल विचारसरणीने..”

कॅप्टन जोया अग्रवाल त्यांच्या अनुभवावरून म्हणाल्या, “जेव्हा मी माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली होती, तेव्हा मी माझ्या संस्थेतील पाचवी आणि सर्वांत तरुण पायलट होती. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मला माझ्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा 200 टक्के जास्त मेहनत करावी लागली. पण प्रश्न असा आहे की हे फक्त महिल्यांच्या बाबतीतच का असं होतं? खरा बदल आपल्या विचारसरणीने सुरू होतो. त्यामुळे जोपर्यंत आपण मुलं आणि मुली यांच्यामध्ये फरक करणं थांबवत नाही, तोपर्यंत काहीही बदलणार नाही. कारण लक्षात ठेवा, स्वप्नांना कोणतंच लिंग नसतं.”

एव्हलिन डी ग्रुइटर काय म्हणाल्या?

या चर्चेत महिलांबद्दल बोलताना एव्हलिन डी ग्रुइटर यांनी सांगितलं की, त्यांच्या संस्थेची स्थापना 1950 च्या दशकात झाली होती. तेव्हा जर्मनीतील महिलांना काम करण्यासाठी किंवा बँक खातं उघडण्यासाठी त्यांच्या पतीची परवानगी आवश्यक होती. “आता बरंच काही बदललं आहे. परंतु अजूनही अनेक अडथळे दूर करायचे आहेत. महिलांना फक्त संचालक मंडळावर असणं पुरेसं नाही. कॉर्पोरेट कल्चरसुद्धा बदलण्याची गरज आहे”, असं मत त्यांनी मांडलं.