
Jio Blackrock Deal: आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी केलेल्या कराराची उद्योग जगतात मोठी चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे हा करार कुठल्या एका टेबलवर, बैठकांच्या सत्रानंतर झालेला नाही. तर एका कारमध्ये अवघ्या पाच मिनिटात हा ऐतिहासिक सौदा झाला आहे. केवळ 5 मिनिटांचा कार राईडमध्ये हा सौदा करण्यता आला. या पाच मिनिटात 2700 कोटींहून अधिकचा सौदा झाला. याविषयीची माहिती दस्तूरखुद्द रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मुंबईत दिली. मुंबईत जिओ ब्लॅकरॉकच्या ‘Investing for a New Era’ कार्यक्रमात त्यांनी ब्लॅकरॉकचे सीईओ लॅरी फिंक यांच्यासोबतच्या करारची आठवण सांगितले.
पाच मिनिटात 2717 कोटींचा करार
मुकेश अंबानी यांनी एका कार्यक्रमात याविषयीची माहिती दिली. त्यानुसार, 2023 मध्ये आम्ही करारावर चर्चा केली. त्याचवेळी मी म्हटलो की, लॅरी ब्लॅकरॉक ही भारतात परत यायला हवी. अवघ्या पाच मिनिटांच्या या चर्चेत लॅरी फिंक यांनी मला विचारले, काय तुम्ही माझ्यासोबत या व्यवसायात भागीदारी कराल? त्यातून मग जिओ ब्लॅकरॉक व्हेंचर आले. हा करार 300 दशलक्ष डॉलरचा, 2717 कोटींचा असल्याची माहिती अंबानी यांनी दिली. या करारानुसार, जिओ फायनेन्शिअल सर्व्हिसेस आणि ब्लॅकरॉक एकसमान भागीदार आहेत.
सर्वात मोठी ॲसेट मॅनेजर
ब्लॅकरॉक, ही जगातील सर्वात मोठी ॲसेट मॅनेजर कंपनी आहे. या कंपनीचे सीईओ हे 73 वर्षीय लॅरी फिंक हे आहेत. ब्लॅकरॉक डिसेंबर 2025 च्या अखेरीस 14 ट्रिलियन डॉलरच्या गुंतवणुकीचे व्यवस्थापन करत आहे. लॅरी फिंक यांनी सुद्धा मुकेश अंबानी यांच्यासोबतच्या त्या पाच मिनिटांच्या कराराविषयीची आठवण जागवल्या. ते म्हणाले की आम्हाला पॉईंट A ते पॉईंट B पर्यंत जायचे होते. आम्ही त्या कार राईडदरम्यान हा सर्वात मोठा करार केला. त्यामाध्यमातून ब्लॅकरॉक ही पुन्हा भारतात परतली. बाजारतील तज्ज्ञानुसार, दोन्ही अब्जाधीशांमधील बॉडिंग आणि व्यवसायासाठीची समजूतदारपणा यातून दिसून येतो. कारण अवघ्या पाच मिनिटात इतका मोठा सौदा होण्यासाठी परस्परांविषयीचा विश्वास आणि बाजारातील पतही महत्त्वाची असते. अशा प्रकारचे करार क्वचितच होतात.
मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती किती?
मुकेश अंबानी हे रिलायन्स इंटस्ट्रीजचे अध्यक्ष आहेत. हा समूह मीडिया, किरकोळ बाजार, आर्थिक सेवा, तेल, इंधन आणि नैसर्गिक वायू, दूरसंचार, पेट्रोकेमिकल्स सह अनेक क्षेत्रात सर्वात आघाडीवर आहे. या कंपनीचे मूल्य अनेक पटींनी अधिक आहे. फोर्ब्सनुसार, मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती ही 103.8 अब्ज डॉलर इतकी आहे.