
शुक्रवार उजाडताच शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला. कारण भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या अंकांनी घसरले. 1 फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार बरेच सावध झाले आहेत. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स जवळपास 625 अंकांनी (0.75%) घसरून थेट 81,941.03 च्या नीचांकी पातळीवर पोहोचला. निफ्टीसुद्धा 194 अंकांनी घसरून 25,224.35 वर पोहोचला. यामुळे गुंतवणूकदारांनी सुरुवातीच्या व्यवहाराच्या 15 मिनिटांत जवळपास 4 लाख कोटी रुपये गमावले आहेत. बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल 455.73 लाख कोटी रुपयांवर घसरलंय.
1. अर्थसंकल्पाची चिंता
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण रविवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यंदा बजेसाठी एक खास ट्रेंडिंग सत्रसुद्धा होतं. यामुळे गुंतवणूकदार थोडं किनाऱ्यावरच उभं राहून बाजाराचं निरीक्षण करत होते. भारताच्या आर्थिक विकासासाठी आणि कंपन्यांच्या कमाईची दिशा जाणून घेण्यासाठी अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
2. रुपयाचं अवमूल्यन
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. शुक्रवारच्या सुरुवातीच्या व्यवहारात रुपया 7 पैशांनी वाढून 91.9850 वर पोहोचला होता. रुपयाच्या अवमूल्यनामुळेही शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्याचं दिसतंय.
3. कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती
कच्च्या तेलांच्या वाढलेल्या किंमतींनी गुंतवणूकदारांची चिंता आणखी वाढवली आहे. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि इराणवर अमेरिकेच्या संभाव्य हल्ल्याच्या भीतीमुळे तेलाच्या किमती पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचल्या आहेत. यामुळे जागतिक पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे.
4. जागतिक स्तरावर जोखीम टाळण्याची वृत्ती
जागतिक स्तरावरील सावध वातावरणामुळे जोखीम घेण्याची क्षमता आणखी कमी झाली आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या आशियाई व्यवहारात शेअर बाजारात चढउतार पहायला मिळाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी द्विपक्षीय कराराचं समर्थन केलं आणि फेडरल रिझर्व्हचं नेतृत्व करण्यासाठी त्यांच्या उमेदवाराचा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
5. तांत्रिकी संकेत
शेअर बाजारात सध्या सावधगिरीची भावना आणखी वाढली आहे. कारण तांत्रिकी संकेतसुद्धा जवळच्या येणाऱ्या काळात कमकुवततेचा इशारा देत होते. विश्लेषकांनीही इशारा दिला आहे की नवीन ट्रिगर्सच्या अनुपस्थितीत निर्देशांकाची उच्च पातळी टिकवून ठेवण्याची क्षमता अनिश्चित राहील.