शेअर बाजाराच्या नादात गमावले 55 लाख, ऑप्शन ट्रेडिंग किती धोकादायक? वाचा…

एका तरुणाने शेअर बाजारात ऑप्शन ट्रेडिंग करून 55 लाख रुपये गमावल्याची माहिती समोर आली आहे. ऑप्शन ट्रेडिंग काय आहे ते सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शेअर बाजाराच्या नादात गमावले 55 लाख, ऑप्शन ट्रेडिंग किती धोकादायक? वाचा...
option trading
| Updated on: Jul 18, 2025 | 11:01 PM

शेअर बाजारातून अनेकजण चांगली कमाई करत आहेत, मात्र त्याचवेळी बऱ्याच लोकांना नुकसानही सहन करावे लागत आहे. उत्तर प्रदेशातील पिलीभीतमधील एका तरुणाने शेअर बाजारात ऑप्शन ट्रेडिंग करून 55 लाख रुपये गमावल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणाने छोट्या रकमेसह सुरुवात केली होती. मात्र कालांतराने त्याने भांडवल वाढवले. त्याने बँकेकडून आणि नातेवाईकांकडून 45 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचे समोर आले आहे. हा सर्व पैसा त्याने शेअर बाजारात गमावला.

कालांतराने या तरुणाच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले. त्याच्या मुलांचे शिक्षणही बंद झाले आहे. त्याच्या घरात अन्नासाठीही पैसे शिल्लक नाहीत. त्यामुळे आता या तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून मदत मागितली आहे. आज आपण हा तरुण शेअर बाजारात ज्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये कर्जबाजारी झाला त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय?

ऑप्शन ट्रेडिंग हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा एक मार्ग आहे. जो सर्वात जलद परतावा देण्यासाठी ओळखला जातो. यामध्ये तुम्ही थेट शेअर्स खरेदी करत नाही, मात्र तुम्हाला निश्चित किमतीवर शेअर्स खरेदी करण्याचा किंवा विकण्याचा पर्याय मिळतो. यासाठी तुम्हाला पैसे द्यावे लागतात, याला प्रीमियम म्हणतात. ऑप्शनमध्ये कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शन असे दोन पर्याय असतात.

कॉल आणि पुट ऑप्शनचा अर्थ काय?

कॉल ऑप्शन निफ्टी, सेन्सेक्स, बँक निफ्टी अशा सेगमेंटमध्ये शेअर्स खरेदी करण्याचा पर्याय देतो. आज जर निफ्टीचा 25000 चा कॉल आज 100 रुपयांना आहे आणि त्याचा एक लॉट (75) खरेदी केला तर तो एक्सपायरीपर्यंत ठेवता येतो. पण त्याआधी मार्केटमध्ये तेजी आली आणि 100 चा प्रिमियम 125 रुपयांना गेला तर तु्म्ही तो विकून तुम्ही प्रतिशेअर 25 रुपये याप्रमाणे 1875 रुपयांचा नफा कमवू शकता. मात्र मार्केट कोसळले तर आणि प्रिमियम झिरोही होऊ शकतो, म्हणजेच तुम्हाला 7500 रुपयांचा तोटा होऊ शकतो. पुट ऑप्शन कॉल ऑप्शनच्या विरुद्ध आहे. मार्केट पडले तर पुट ऑप्शन खरेदी करणाऱ्याला फायदा होतो.

तोटा का होतो?

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये तोटा होण्याचे कारण म्हणजे मार्केट तुमच्या विरोधात जाते. हे अनेकदा घडते. मार्केट विरोधात गेल्यास तुम्ही जो प्रिमियम भरता तो पूर्णपणे गमवावा लागतो. तसेच अनेक लोक स्टॉप लॉस लावत नाहीत, यामुळे तुम्हाला पूर्ण प्रिमियम गमवावा लागतो.

या गोष्टी लक्षात ठेवा

शेअर बाजारात पैसे गुंतवताना जोखीम असते. त्यामुळे अभ्यास करुन गुंतवणूक करणे महत्वाचे आहे. एखाद्याच्या सांगण्यावरून गुंतवणूक करणे चुकीचे आहे. सोशल मीडियावरील टिप्स घेऊन ट्रेडिंग करु नका. तसेच तुमच्या क्षमतेनुसार गुंतवणूक करावी. कर्ज काढून किंवा आवश्यक असणारे पैसे गुंतवणूकीसाठी वापरू नये.