शेअर बाजारात अवघ्या 10 मिनिटांत चित्र पालटले! अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियातील घसरणीचा भारतीय बाजारालाही मोठा फटका
Stock Market Fall After Opening Rally: आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात जोरदार झाली; सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी मोठी उसळी घेत व्यवहार सुरू केले. विशेषतः, बीएसई सेन्सेक्सने बाजार उघडताच ७०० अंशांहून अधिक झेप घेतली, परंतु काही मिनिटांतच तो पुन्हा वेगाने खाली कोसळला.

आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात केली. बाजार उघडताच गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. सेन्सेक्सने तर सुरुवातीलाच 700 हून अधिक अंकांची झेप घेतली, तर निफ्टीनेही 26 हजारांच्या महत्त्वपूर्ण टप्प्याच्या दिशेने वाटचाल केली. मात्र, हा आनंद फार काळ टिकला नाही. बाजार सुरू झाल्यानंतर अवघ्या 10 मिनिटांतच तेजीचे रूपांतर मोठ्या घसरणीत झाले. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी अचानक दिशा बदलली. सेन्सेक्स एका झटक्यात 650 हून अधिक अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्येही मोठी पडझड पाहायला मिळाली.
भारतीय बाजारातील या अचानक आलेल्या घसरणीमागे जागतिक बाजारातील नकारात्मक संकेत महत्त्वाचे ठरले. अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया आणि हाँगकाँगमधील शेअर बाजारांमध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला.
सेन्सेक्सची 743 अंकांची झेप अन् अचानक मोठी घसरण!
सोमवारच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्सने मागील बंद पातळी 83,919 वरून 84,421 वर सुरुवात केली. सुरुवातीच्या खरेदीमुळे निर्देशांकाने काही मिनिटांतच 743 अंकांची वाढ नोंदवत 84,662 चा उच्चांक गाठला. मात्र, या तेजीला फार काळ टिकता आले नाही. विक्रीचा दबाव वाढताच सेन्सेक्सने जोरदार घसरण सुरू केली आणि पाहता पाहता 658 अंकांनी खाली येत 83,210 ची पातळी गाठली.
निफ्टीचीही परिस्थिती काही वेगळी नव्हती. मागील सत्रात 25,800 वर बंद झालेल्या निफ्टीने सोमवारी 25,929 वर व्यवहार सुरू केला. सुरुवातीच्या तेजीमुळे तो 25,992 पर्यंत पोहोचला. मात्र, त्यानंतर अचानक विक्रीचा जोर वाढला आणि निफ्टी घसरून 25,567 च्या पातळीवर आला.
जागतिक बाजारातील पडझडीने भारतीय गुंतवणूकदारांची चिंता वाढवली
भारतीय शेअर बाजाराला सुरुवातीला गिफ्ट निफ्टीकडून सकारात्मक संकेत मिळत होते. गिफ्ट निफ्टीमध्ये सुमारे 150 अंकांची वाढ असल्याने देशांतर्गत बाजारातही तेजी राहण्याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात बाजाराची सुरुवातही सकारात्मक झाली. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारांमधील घसरणीने भारतीय बाजारातील तेजीवर पाणी फेरले.
जपानच्या निक्केई निर्देशांकात 3,000 हून अधिक अंकांची घसरण झाली. हा निर्देशांक 5 टक्क्यांपेक्षा अधिक खाली आला. हाँगकाँगचा हँग सेंग निर्देशांकही जवळपास 1 टक्क्याने घसरला. दक्षिण कोरियाच्या कोस्पी निर्देशांकात सुमारे 160 अंकांची म्हणजेच 3.20 टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली. याशिवाय ब्रिटनच्या शेअर बाजारातही 1 टक्क्याहून अधिक घसरण पाहायला मिळाली.
जागतिक बाजारांमधील या अस्थिरतेमुळे भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांनीही सावध भूमिका घेतल्याचे चित्र दिसले.
आयटी शेअर्समध्ये तेजी; बँकिंग आणि मेटल शेअर्सवर विक्रीचा दबाव
बाजारात मोठी घसरण सुरू असतानाही आयटी क्षेत्रातील काही प्रमुख शेअर्समध्ये मात्र चांगली तेजी पाहायला मिळाली. टीसीएसच्या शेअरमध्ये 3.20 टक्के, टेक महिंद्रामध्ये 2.80 टक्के, इन्फोसिसमध्ये 2.50 टक्के आणि एचसीएल टेकमध्ये 1.90 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. दुसरीकडे, बँकिंग आणि मेटल क्षेत्रातील शेअर्सवर मोठा दबाव दिसून आला. टाटा स्टीलचा शेअर 5 टक्क्यांनी घसरला. अॅक्सिस बँकेत 2.50 टक्के, एसबीआयमध्ये 2.60 टक्के, आयसीआयसीआय बँकेत 1.35 टक्के आणि एचडीएफसी बँकेत 1.15 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचा इशारा
जागतिक बाजारातील घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांची भूमिका आणि विविध क्षेत्रांमधील विक्रीचा दबाव यामुळे शेअर बाजारात मोठी अस्थिरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे केवळ बाजारातील सुरुवातीची तेजी पाहून गुंतवणुकीचे निर्णय घेणे टाळावे.
(महत्त्वाची सूचना: शेअर बाजारातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणताही गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा.)